मुंबई : आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या चित्रपटावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी 25 कोटी रुपयांचा दावा दाखल केल्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट कोणत्याही व्यक्तिरेखेवर आधारित नाही. महिलांना फसवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं. तुम्ही जर हे केलं नाही तर का झोंबतंय? असा सवालही त्यांनी केला.
Maharashtra Epstein Files : काय आहे प्रकरण?
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. सध्या अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, या टीझरमधून अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पहिली झलक पाहायला मिळतीय.
दिपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली. त्यावर रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना नोटीस पाठवली आहे. चाकणकरांनी त्यांच्यावर 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
Dipali Sayyed Vs Rupali Chakankar : दिपाली सय्यद यांचं उत्तर
या सगळ्यावर आता दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “आमच्यावर 25 कोटींचा दावा करण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने हा दावा दाखल केला आहे त्याच्यावर हसू येतं. कारण हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर आधारीत नाही, आत्मचरित्र नाही, किंवा त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा वापर करण्यात आला नाही.
हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंदुगिरीवर आधारित आहे. त्या भोंदुगिरीला कित्येक महिला बळी पडल्या असून त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. त्यांना कुठेतरी या गोष्टीचं ज्ञात व्हावं, त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की या चित्रपटात कोणत्याही व्यक्तिरेखेचा वापर किंवा त्याच्या नावाचा वापर करण्यात आला नाही. महाराष्ट्रात जे घडलं गेलं आहे, ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा दावाही त्यांनी केला.
Maharashtra Epstein Files : तुम्हाला का झोंबतंय?
रुपाली चाकणकरांना उत्तर देताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, “हा चित्रपट करत असताना तुम्ही आमच्यावर 25 कोटींचा दावा दाखल करत असाल तर कुठेतरी चुकतंय. हा चित्रपट न करू देण्यामागे तुम्ही जे केलं आहे ते खरं आहे का? असा प्रश्न पडतोय. तुम्ही असं करायला नको होतं. तुम्हाला हे झोंबतंय का? “
महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत. एक कलाकार म्हणून आम्ही सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. जे काही असेल त्या गोष्टीला आम्ही कोर्टात उत्तर देऊ, अशी भूमिकाही दिपाली सय्यद यांनी मांडली.
ही बातमी वाचा: