Satluj Ban Controversy: असंख्य सेन्सॉर कट, सरकारचा प्रचंड दबाव; रिलीजनंतर ‘सतलज ‘ 48 तासांत OTTवरून हटवला, मंत्रालयातून आलेलं बंदीचं पत्र; दिग्दर्शकाचे धक्कादायक गौप्यस्फोट


Satluj Diljit Dosanjh Movie: दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ चित्रपट (Satluj) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आधी ‘पंजाब 95’ नावाने रिलीज होणारा हा चित्रपट ‘सतलज’ या नावाने रिलीज झाला. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला सेन्सॉरसंबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय.अखेर 3 जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मात्र, अवघ्या 48 तासात भारतात त्यावर बंदी घालण्यात आली आणि जगभरातील प्लॅटफॉर्मवरून तो हटवण्यात आला.आता या संपूर्ण वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या दाव्यांची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. 

31 वर्षांपूर्वी जसवंत सिंह खालरा यांचं अपहरण करून त्यांचे हत्या करण्यात आली होती.आज 31 वर्षानंतर त्यांच्या कथेवर आधारित चित्रपट असंख्य सेंसॉर कात्र्यांनंतर चित्रपटगृहात नव्हे तर OTT वर प्रदर्शित झाला.अवघ्या 48 तासांमध्ये हा चित्रपट काढून टाकण्यात आला. Imdbवर या चित्रपटाला देण्यात आलेला रेटिंगही गायब झालं. जगभरातील चित्रपटप्रेमींकडून ‘ सतलज ‘ बॅनवर प्रश्न विचारले जात असताना आतापर्यंत नेमकं काय काय झालं याबाबत सतलज चित्रपटाचे दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी सगळंच सांगितलं आहे.

मंत्रालयाकडून चित्रपट थांबवण्याचं पत्र

‘जेव्हा जेव्हा प्रदर्शनाची घोषणा केली त्या त्या वेळेस सरकारकडून दबावाला आणि आम्हाला प्रदर्शन पुढे ढकलावे लागले.त्यामुळे कुठलाही प्रोमो न देता, शांतपणे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.मला स्वतःला निर्मात्यांनी आणि प्लॅटफॉर्म ने घेतलेला हा निर्णय प्रदर्शनाच्या काही दिवस आधी कळाला होता’ असं दिग्दर्शक हनी त्रेहान म्हणाले. ते पुढे म्हणाले ‘निर्मात्यांनी मला फोन करून सांगितले की झी5 ला ‘पंजाब 95 ‘ वेगळ्या नावाने प्रदर्शित करायचा आहे.अर्थात मला त्यात काही अडचण नव्हती. मी त्यांना फक्त सांगितले की, चित्रपटात कोणतेही कट्स नसावेत. त्यांनी याला सहमती दर्शवली. ‘सतलज ‘ या नावाला परवानगी मिळाली होती.मग आम्ही तो प्रदर्शित केला.’असं त्रेहान म्हणाले.

बंदी घालण्यापूर्वी नेमकं काय घडलं? 

  • CBFC सोबतच्या वादाबद्दल बोलताना दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी सांगितलं ‘ सुरुवातीला सेन्सर बोर्डाने आम्हाला चित्रपटात 21 कट सुचवले होते.आम्ही त्याला विरोध केला आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.जुलै 2023 पर्यंत आमची बाजू मजबूत होती आणि निकाल आमच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. मात्र त्यानंतर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी आमच्यावर दबाव आणला.चर्चेदरम्यान 21 कट्सऐवजी 127 कट्स करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यामुळे शेवटी आम्ही चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ‘ असं दिग्दर्शक त्रेहान म्हणाले.
  • प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून, आम्ही उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली.मात्र निर्मात्यांवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला.हे अत्यंत दुर्दैवी होतं.चित्रपटाच्या प्रदर्शनाची सरकारला माहिती होती असं मला वाटत नाही.कारण मलाच त्याबद्दल काही माहिती नव्हती.मला किंवा माझा निर्मात्यांना सरकारकडून कोणताही फोन आला नाही.मात्र झी5 ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्या संदर्भात पत्र मिळालं होतं’ असं दिग्दर्शक हनी त्रेहान म्हणाले .
  • इंटर डिपार्टमेंटल कमिटी (IDC) सोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना हनी त्रेहान म्हणाले ‘मी समितीसमोर हा चित्रपट माझ्यासाठी का महत्त्वाचा आहे हे स्पष्ट केलं होतं.मात्र अवघ्या दोन दिवसांनी झी 5 कडून मला कळवलं गेलं की, IDCने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता.या देशात प्रत्येक गोष्टीचे एवढं राजकीय ध्रुवीकरण का केलं जातं?हे मला समजत नाही ‘असंही ते म्हणाले.
  • सरकारी समितीने पाकिस्तान, फुटीरतावादी किंवा भारत विरोधी शक्ती या चित्रपटाचा वापर करू शकते, असा दावा केला होता. त्यावरही त्रेहान म्हणाले ‘या आरोपांना कोणताही ठोस आधार नाही.माझ्या चित्रपटामुळे पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं सांगितलं जात आहे.पण प्रत्यक्षात माझ्या चित्रपटाने पंजाब मधील लोकांना एकत्र आणलं आहे.पंजाब मध्ये हिंदू आणि शीख समाजातील लोक एकत्र बसून हा चित्रपट पाहत आहेत.माझ्या चित्रपटाचा उद्देश कोणालाही भडकवण्याचा नाही.उलट, ज्यांनी अनेक वर्ष वेदना आणि अन्याय सहन केला त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचं काम हा चित्रपट करतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या 48 तास लोकांनी कोणताही गोंधळ न घालता आपल्या घरात शांतपणे हा चित्रपट पाहिलाय.त्या काळात कुठेही कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली नव्हती.मात्र सरकारने बंदी घातल्यानंतर या प्रकरणाला आंदोलनाचे रूपांतर मिळालं.असा दावाही त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *