Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन


Congress Ratnakar Mahajan Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांचे निधन झाले. ते 80  वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्याच्या (Pune news) नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रत्नाकर महाजन यांच्या जाण्याने काँग्रेसचा (Congress) अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेता हरपला आहे. (Maharashtra Politics news)

रत्नाकर महाजन  हे राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपदही भुषविले होते. समाजवादी विचारवंत , राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसशी शेवटपर्यंत इमान कायम राखणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. रत्नाकर महाजन हे डॉक्टर होते. मात्र, समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. रत्नाकर महाजन यांनी आणीबाणीच्या काळात सक्रियपणे काम केले होते. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगडही त्यांच्यावर होता. समाजवादासोबतच त्यांनी आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरणात आले होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली. याच प्रवासात ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले.  

डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची पिछेहाट होत असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे आणि जोरसकपणे लावून धरण्याची जबाबदारी रत्नाकर महाजन यांनी योग्यपणे पार पाडली. अलीकडे राजकारणाचा स्तर घसरत असताना प्रवक्ते म्हणून रत्नाकर महाजन यांची  अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रस्ताळेपणा किंवा अपशब्द न वापरता समोरच्याला आपली बाजू पटवून देणे आणि राजकीय नैतिकता या गुणांची अधिकच प्रकर्षाने जाणीव होते. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *