Last Updated:
बारावीतील अभियांत्रिकी सीईटी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मेव्हण्याला घरात घुसून कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सांगली : भविष्यातील उच्च शिक्षणासाठी इयत्ता बारावीच्या वर्षाला सगळीकडे अधिक महत्त्व दिले जाते. करिअर ठरवण्यासाठी बारावीचे अकॅडमिक वर्ष टर्निंग पॉईंट असते खरे, परंतु बऱ्याचदा पालकांकडून दहावी-बारावीला धरून अतिशयोक्ती होताना दिसते. याची प्रचिती देणारी चिंताजनक घटना सांगलीत घडली आहे. बारावीतील अभियांत्रिकी सीईटी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मेव्हण्याला घरात घुसून कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अभियांत्रिकी सीईटी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने पत्नी, मुलगा आणि नातेवाइकांना शिवीगाळ करत मेव्हण्याच्या घरावर दगडफेक करून कोयत्याने कारची तोडफोड केल्याचा प्रकार मिरज तालुक्यातील बेडग रोडवर घडला. याप्रकरणी पन्नास वर्षीय महारुद्र कुंभार, राहणार ढालगाव, ता. कवठेमहांकाळ यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील महारुद्र कुंभार यांची मुलगी वैष्णवी हिला सीईटी परीक्षेत 80 टक्के मार्क पडले. वर्षभर अकॅडमीत प्रशिक्षण घेऊनही सीईटी परीक्षेत मार्क कमी पडल्याने महारुद्र कुंभार याने संताप व्यक्त केला. यामुळे घाबरलेल्या महारुद्र यांच्या पत्नी आणि ढालगाव येथील शिक्षिका सविता महारुद्र कुंभार या मिरजेत भावाकडे निघून आल्या. महारुद्र आणि सविता या दाम्पत्यास तीन मुली आणि एक मुलगा आहे.
महारुद्र शिवाप्पा कुंभार यांनी सीईटी परीक्षेत मुलगी वैष्णवी हिला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मिरजेत मेव्हण्याच्या घरात येऊन पत्नी आणि मुलाला जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर मेव्हणा मारुती कुंभार यांच्या घरावर दगडफेक करून नुकसानदेखील केले.
मारुती कुंभार यांच्या चारचाकी वाहनावर कोयत्याने वार करून गाडीच्या काचा फोडत नुकसान केले. याबाबत सविता कुंभार यांनी पतीविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी महारुद्र कुंभार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या निकालावर नाराज होऊन मुलीच्या वडिलांनी असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे वागणे परिसरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरले आहे. या घटनेमुळे कित्येक पालक अंतर्मुख होत आहेत.
Sangli,Maharashtra
CET परीक्षेत मुलीला कमी मार्क, मेव्हण्याला घरात घुसून केला कोयत्याने वार, सांगलीतील घटना
