सध्या देशभरात भाजपचा जोर आहे. उत्तरेतला पक्ष ही भाजपची आधीची ओळख होती. पण भाजपने आता स्वत:ला देशव्यापी बनवलं आहे. उत्तरेतल्या राज्यांपुरता मर्यादीत न राहता भाजपची दक्षिण, ईशान्येकडेही जोरदार वाटचाल सुरु आहे. त्या त्या राज्यातलं प्रभावी नेतृत्व आणि संघटनात्मक रचनेच्या बळावर भाजपने आतापर्यंत अशक्य वाटणारी राज्य जिंकून दाखवली आहेत. ताजं उदहारण म्हणजे पश्चिम बंगाल. अन्य पक्षातल्या नेत्यांचा भाजपमध्ये ओघ वाढलेला असताना आता भाजपमधला एक बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. भाजपचा दक्षिणेतल्या राजकारणातला हा प्रमुख चेहरा आहे. भाजपचे युवा नेते अन्नामलाई भाजपपासून वेगळे होऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय आहेत.
तामिळनाडूमध्ये मागच्याच महिन्यात सरकार स्थापन झालं. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या थलपती विजय यांच्या हातात तामिळ जनतेने राज्याची सूत्रं दिली. आता तामिळ राजकारणात लवकरच एका नव्या पक्षाचा उदय होऊ शकतो. तामिळनाडूच्या कोयम्बूटर शहरात ठिकठिकाणी अन्नामलईचे पोस्टर लागले आहेत. त्या फोटोंवर अन्नामलाईचे फोटो आणि संदेश आहे. अन्नामलाई पुढच्या दोन ते तीन दिवसात भाजपमध्ये रहायचं की नाही? या बद्दल निर्णय घेऊ शकतात. हे अन्नामलाई कोण आहेत? ते जाणून घेऊया.
ते बंगळुरु दक्षिणमध्ये पोलीस उपायुक्त होते
अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी नोकरी सोडून तामिळनाडू सारख्या राज्यात भाजपची निवड केली, जिथे मूळातच भाजपचा जनाधार खूप कमी आहे. IPS असलेल्या अन्नामलाई यांची कर्नाटक पोलीस दलता सिंघमची प्रतिमा होती. राजकारणात येऊन काम करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून अन्नमलाई यांनी 2019 मध्ये पोलीस दलातील पदाचा राजीनामा दिला. ते बंगळुरु दक्षिणमध्ये पोलीस उपायुक्त होते. उडुपी एसपी म्हणून त्यांची बदली करण्यात आली. त्यावेळी तिथल्या लोकांनी या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं.
कैलाश मानसरोवर यात्रेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
कैलाश मानसरोवर यात्रेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि प्राथमिकता बदलल्याच त्यांनी म्हटलं होतं. त्याशिवाय डिसेंबर 2018 मध्ये सिनियर आयपीएस पोलीस अधिकारी मधुकर शेट्टी स्वाइन फ्लूने अचानक मृत्यू झाला. याचा त्यांच्यावर परिणाम झाला.
पण रंजनीकांत यांनी काही निर्णय घेतला नाही
मे 2020 साली एका फेसबुक लाईव्ह सेशन दरम्यान अन्नामलाई यांनी मी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेशाचा विचार करतोय असं म्हटलेलं. तामिळनाडूची पुढची विधानसभा निवडणूक लढवू शकतो. कुठल्या पक्षात जायचं हे अन्नामलाई यांनी सुरुवातीला ठरवलं नव्हतं. एकवेळ ते बोललेले की, मी रजनीकांतच्या घोषणेची वाट बघतोय. पण रंजनीकांत यांनी काही निर्णय घेतला नाही.
त्यानंतर तीन महिन्यांनी अन्नामलाई भाजपमध्ये सहभागी झाले. “वेळेबरोबर ही गोष्ट माझ्या लक्षात आलीय की, सामाजिक बदलाबरोबर देशात एक राजकीय बदल सुद्धा आवश्यक आहे. मला वाटलं की, भाजप माझ्यासाठी आवश्यक आहे. कारण माझे सिद्धांत भाजपसोबत जुळतात. म्हणून मी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला” असं एक वर्तमानपत्रासोबत बोलताना अन्नामलाई म्हणाले होते.