Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला ‘स्पायडरमॅन’ हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार


ठाणे : मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यातही मान्सूनने जोरदार धुमशान घातल्याचं चित्र आहे. भिवंडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Bhiwandi Heavy Rain) अनेक मुख्य रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आलं असून ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि त्यातच पडलेल्या मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

अशा अत्यंत गंभीर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची (BNCMC) आपत्कालीन यंत्रणा आणि कर्मचारी रस्त्यावर कुठेही दिसून न आल्याने, शेवटी त्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी चक्क ‘स्पायडरमॅन’ (Spiderman) रस्त्यावर उतरल्याचं एक अजब आणि कौतुकास्पद चित्र पाहायला मिळालं.

Bhiwandi Spiderman In Rain : खड्ड्यातून वाहने काढण्यासाठी ‘स्पायडरमॅन’ पाण्यात

भिवंडीतील रस्त्यांवर थेट स्पायडरमॅनच्या वेशात उतरलेल्या या अवलियाचे नाव शादाब मोमिन (Shadab Momin) असे आहे. तो भिवंडीचाच स्थानिक रहिवासी आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराची झालेली दुरवस्था पाहून शादाबने स्वतः स्पायडरमॅनचा कॉस्च्युम परिधान केला आणि तो थेट भरलेल्या पाण्यात उतरला.

जलमय रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने तो स्वतः पाण्यात उभा राहून लोकांना सुरक्षित मार्ग दाखवत होता. खड्ड्यांमध्ये अडकलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने धक्के मारून बाहेर काढणे, वाहतूक कोंडी सुरळीत करणे आणि पादचाऱ्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी तो तासनतास पावसात मेहनत करत होता.

यापूर्वीही शादाब मोमिन याने भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इतर सखल भागात पाणी साचलेले असताना, स्वतः चेंबरमध्ये साचलेला कचरा आणि अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना त्याने सुरक्षित बाहेर काढले आहे.

Bhiwandi Rain Update : प्रशासन कधी जागं होणार?

नागरिकांची मदत करत असताना शादाब मोमिन याने भिवंडी महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर अत्यंत संतप्त शब्दांत कडाडून टीका केली. तो म्हणाला की, “दरवर्षी शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणि नालेसफाई मंजूर होते, कागदावर मोठे दावे केले जातात. मात्र, पावसाळा सुरू झाला की पहिल्याच पावसात रस्ते खड्ड्यांनी भरतात, सगळीकडे पाणी साचते आणि सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खरं तर हे काम महापालिकेच्या आपत्कालीन पथकाचे आणि कर्मचाऱ्यांचे आहे, पण ते कुठेच रस्त्यावर दिसत नाहीत. म्हणूनच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी शेवटी या ‘स्पायडरमॅन’ला रस्त्यावर उतरावं लागलं आहे.”

पुढे बोलताना त्याने खड्डे, साचलेले पाणी, अपघात आणि उघड्या डीपी आणि वायरमुळे लागणारा विजेचा धक्का यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.”शहरात एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच हे सुस्त प्रशासन जागे होणार का? असा जळजळीत सवालही त्याने यंत्रणेला विचारला आहे. 

Bhiwandi Rain News : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

पावसाळ्यात शहरात पुन्हा पाणी साचणार नाही, रस्ते तातडीने खड्डेमुक्त होतील आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्याने केली.

सध्या भिवंडीतील या ‘स्पायडरमॅन’चे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, एका सामान्य नागरिकाच्या या अनोख्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे भिवंडी प्रशासनाच्या नाकर्तेपणावर नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *