Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर ‘एक्झिबिशन सेंटर’ उभारण्यास महापालिकेची मंजुरी


मुंबई : मुंबईतील खुल्या जागा आणि खेळाच्या मैदानांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वांद्रा रिक्लेमेशन (Bandra Reclamation) येथील खेळासाठी राखीव असलेल्या एका महत्त्वाच्या भूखंडाचा वापर आता ‘एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर’ (Exhibition and Convention Center) म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सुधार समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

महापालिकेच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. हे मैदान फक्त खेळासाठीच वापरण्यात यावं, यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते.

Bandra Football Ground News : आदित्य ठाकरेंचा होता तीव्र विरोध

वांद्र्यातील हा भूखंड सध्या एक उत्तम फुटबॉल मैदान म्हणून वापरात असून मुंबईतील फुटबॉलपटू आणि क्रीडाप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. आदित्य ठाकरे हे मुंबई फुटबॉलशी संबंधित संस्थेचे अध्यक्ष राहिले असून, या मैदानाच्या संवर्धनासाठी त्यांनी यापूर्वी विशेष प्रयत्न केले होते.

हा भूखंड एक्झिबिशन सेंटरला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती आणि या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, त्यांचा विरोध डावलून सुधार समितीने अखेर या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

Football Ground Exhibition Center :  ‘पैसा कमवण्यासाठी मैदाने विकू नका’

मुंबईत आधीच मोकळ्या जागा आणि खेळाची मैदाने दिवसेंदिवस कमी होत असताना, या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्याच्या निर्णयावरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

ते म्हणाले की, “मागच्या वेळेस जेव्हा हा प्रस्ताव आला होता, तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध केला होता. आमच्या विरोधामुळे त्यांनी हा प्रस्ताव मागे घेतला होता. पण आता पुन्हा एकदा हाच प्रस्ताव आणून तो चोरट्या मार्गाने पारित करण्यात आला आहे. या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध खेळाडूंनी सराव केला आहे, सामने खेळले आहेत. केवळ पैसा कमवण्यासाठी तुम्ही मुंबईतील हक्काची मैदाने कमी करत आहात, हे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे.”

Bandra Reclamation Football Ground : नव्या राजकीय वादाची ठिणगी

मुंबईतील अनेक क्रीडा संस्था आणि स्थानिक नागरिकांमधूनही या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मुलांचे खेळण्याचे हक्क हिरावून घेऊन तिथे सिमेंटचे जंगल आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. 

सुधार समितीच्या या मंजुरीनंतर आता मुंबईत ‘मैदाने वाचवा’ ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, आगामी काळात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा पाहायला मिळू शकतो.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *