Bacchu Kadu : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात बरंच काही घडून गेलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. सध्या बच्चू कडू हे आमदार आहेत. ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा उभी फूट पडली आहे. त्यांच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांचे नुकसान, पावसाचे दुर्भिक्ष्य, कायदा आणि सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरत आहेत. आता याच पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता या निवडणुकीबाबत तसेच उपसभापतीपदासाठी नेत्याच्या निवडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
पावसाळी अधिवेशनात उपसभापतींची निवड नाही
विधानपरिषदेचे उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे. नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा शिंदे गटाने विधानपरिषदेत आमदारकी दिली आहे. त्यामुळे आता उपसभापतीपदासाठी पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. याच पावसाळी अधिवेशनात ही निवड केली जाऊ शकते, असे सांगितले जात होते. परंतु आता पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापतींची निवड होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
बोलावले जाणार एकदिवसीय अधिवेशन
दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदे यांच्या पक्षातून नंदूरबारचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच आमदार बच्चू कडू यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात निवडणूक न घेता एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या या जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी नीमल गोऱ्हे यांच्या ऐवजी बच्चू कडू किंवा चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची चर्चा केली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता विशेष अधिवेशन नेमके कधी बोलावले जाणार आणि नेमक्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.