Maya Satya Bhram Movie Review: कोलकात्यातून (Kolkata News) दोन जण बेपत्ता होतात. इन्स्पेक्टरचा पाच वर्षांचा मुलगा आणि एक विदेशी संशोधक. या दोघांचा शोध एका आध्यात्मिक बाबाशी येऊन थांबतो. इथूनच माया सत्य भ्रम (2026) या बंगाली सिनेमाचं (Bengali Cinema) कथानक वाकडी-तिकडी वळणं घ्यायला सुरुवात होते. हा शोध अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानाशी जोडला जातो. आदि शंकराचार्यांनी सत्य हे एकच असतं, अशी मांडणी केली. सत्य समोर येतं तेव्हा भ्रम तुटतो, माया संपते आणि सर्व काही काचेसारखं साफ होतं.

समिक रॉय चौधरी यांचा माया सत्य भ्रम (2026) हा बंगाली सिनेमा अद्वैत वेदांताचे दाखले देताना प्रेक्षकांना रोलर कोस्टर राइडचा अनुभव देतो. यातून घडणारं नाट्य हे क्राईम थ्रिलरपेक्षा (Crime Thriller) जास्त फिलॉसॉफिकल बनतं. पण ते जड होत नाही, तर तत्त्वज्ञानाची बाजू अधिक साधी-सोपी करून दाखवतं.

कोलकात्यातला बाबा त्रिलोकदर्शी (सनत चट्टोपाध्याय) या मुख्य पात्राभोवती सिनेमाचं कथानक फिरतंय. त्याच्याकडे येणारे भक्तगण भविष्याची विचारणा करण्यासाठी आलेले असतात. त्रिलोकदर्शी त्यांचा हात पकडून त्यांचा भूतकाळ जाणतो आणि भक्ताला वर्तमानाची जाणीव करून देतो. त्रिलोकदर्शी आणि त्याच्या दैवी शक्तीविषयी संशोधन करायला आलेली परदेशी रिसर्चर सारा हे जवळून पाहत असते. एका दृश्यात ती त्रिलोकला या संदर्भात विचारणा करते. तेव्हा त्रिलोक सत्याची मांडणी करतो. माया (Illusion) आणि भ्रम (Delusion) या पलीकडे सत्य हे जगण्याचं एकमेव साधन आहे. जे आहे ते वर्तमानात आहे. भूतकाळ घडून गेलाय. भविष्याचा अंदाज लावता येत नाही. वर्तमान हेच एकमेव सत्य आहे. त्यात चांगलं जगता आलं पाहिजे, असं तो साराला सांगतो. त्याचवेळी कथानक सत्य माया भ्रम या संकल्पनेतून तावून सुलाखून निघतं.

समिक रॉय चौधरी यांचा माया सत्य भ्रम (2026) सिनेमा आधी दोन घटनांचा शोध घेणारा एक क्राईम थ्रिलर वाटतो. कथानकाची मांडणी नॉन-लिनियर आहे. म्हणजे एका रेषेत घडत नाही. ते त्रिलोक, सारा आणि इन्स्पेक्टरच्या अशा तीन उपकथानकांमध्ये फिरतं. प्रेक्षकाला माया आणि भ्रमात गुंतवून ठेवतं आणि जेव्हा एकमेव सत्य समोर येतं, तेव्हा मेंदूला झिणझिण्या येतील अशी अनुभूती देऊन जातं.
साहिर लुधियानवी यांचा शेर आहे …
आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही इक पल है
समिकचा माया सत्य भ्रम (2026) हीच अनुभूती देतो. माया सत्याचा विपर्यास करते, संभ्रम तयार करते. ज्ञान माणसाला सत्याच्या दिशेने घेऊन जातं.
आधी न्यूयॉर्क इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अमेरिका आणि नंतर बिश्केक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, किर्गिझस्तान अशा दोन ठिकाणी समिक यांच्या माया सत्य भ्रम (2026) या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. पुढच्या महिन्यात सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे.