Ashadhi Ekadashi 2026 : आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2026) दिवस आहे. या निमित्ताने लाखो विठ्ठलभक्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या अनेक कथा आपण ऐकत असतो. पण, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या डाव्या चरणावर आजही एक खोलगट ठसा दिसतो. यामागचं रहस्य नेमकं तुम्हाला माहीत आहे का? अनेक भक्तांच्या मनात प्रश्न पडतो की हा ठसा कसा पडला? यामागे एक अतिशय सुंदर आख्यायिका सांगितली जाते.
‘यासाठी’ विठ्ठलाच्या चरणावर आहे खोल खड्डा…
विठ्ठलाच्या डाव्या चरणावर एक खोल खड्डा का आहे? तर धार्मिक मान्यतेनुसार, मुक्त केशरी नावाची एक दासी होती जी खूप सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा, आपल्या कोमलतेचा तिला खूप अहंकार झालेला. प्रत्येकजण माझ्याकडे आकर्षित होतो आणि माझ्या सौंदर्यापुढे कुणाचंही सौंदर्य टिकणार नाही असा गर्व तिच्या मनामध्ये झालेला. एकदा तिने बघितलं की खूप सारे लोक वारी करत पंढरपूरला जातात, विठ्ठलाच्या दर्शनाला. तर विठ्ठलाप्रती सगळेजण एवढे आकर्षित का असं जेव्हा तिने एका वारकर्याला विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की विठ्ठल हे सौंदर्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे. अहो आमचा विठ्ठल राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. जेव्हा तिने हे ऐकलं की माझ्यापेक्षाही कुणी तरी सुंदर आहे, त्या वेळेस गर्वाने भरून ती विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. आणि तिने जेव्हा विठ्ठलाला पाहिलं तेव्हा ती विचार करायला लागली हा तर एक पाषाण आहे, काळा दगड आहे.
भगवंत आपल्या भक्ताचं सगळं काही सहन करतात पण अहंकार नाही. तिला तिच्या सौंदर्याचा आणि कोमलतेचा अहंकार झालेला, विठ्ठलानी कसा मोडला माहिती आहे? तिनी विचार केला हा तर एक दगड आहे, पण चला आलोच आहे तर त्याला स्पर्श करुन बघू. तर तिने आपल्या कोमल बोटाने विठ्ठलाच्या डाव्या चरणाला स्पर्श केला त्यावेळेस पाषाणाची मूर्ती वितळली आणि तिच्या बोटाचा ठसा विठ्ठलाच्या चरणावर उमटला आणि तिचा अहंकार चूरचूर झाला.
क्षणार्धात चमत्कार घडला. ज्या पाषाणाला ती निर्जीव समजत होती, तो लोण्यासारखा मऊ झाला. तिचं बोट त्या चरणात खोलवर रुतलं आणि तिच्या बोटाचा ठसा कायमचा उमटला. तो क्षण तिच्या आयुष्यातील परिवर्तनाचा होता. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. तिला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. ती विठ्ठलाच्या चरणी कोसळली आणि म्हणाली, “देवा, मी तुझ्या दिव्य सौंदर्याला ओळखू शकले नाही. माझ्या रुपाचा मला गर्व झाला होता. मला क्षमा कर.” भगवान विठ्ठलाने तिच्यावर कृपा केली. त्या दिवसापासून तिचा अहंकार नाहीसा झाला आणि ती विठ्ठलभक्तीत रमून गेली. असं म्हणतात की, विठ्ठलाच्या डाव्या चरणावर आजही दिसणारा तो खोलगट ठसा म्हणजे मुक्त केशरीच्या बोटाचा ठसा आहे.
तर भगवान विठ्ठलाच्या डाव्या चरणावरील खोलगट ठसा म्हणजे अहंकार तुटण्याचं प्रतीक आहे. भगवंत सगळं सहन करतील, आपला अहंकार नाही.
म्हणूनच संत म्हणतात…
“अहंकाराचा त्याग करा, भक्तीचा स्वीकार करा; कारण भगवंत सर्व काही क्षमा करतात, पण अहंकार कधीच स्वीकारत नाहीत.”
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…