ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. यादरम्यानच मोठ्या घडामोडींना वेग येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले होते. ज्यानंतर काहीतरी मोठे घडण्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली. यादरम्यानच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून फुटीर खासदारांवर मोठी टीका केली जात आहे. परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर संजय राऊत यांनी सभेवेळी टीका केली. यादरम्यानच शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.
यादरम्यानच आता आज सकाळी 10.30 वाजता उपसभापती पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार विधानपरिषद उपसभापतीपदाबाबत घोषणा होणार आहे. यादरम्यानच शिंदे गटात मोठी चुरस बघायल मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरून दोन जणांमध्ये मोठी चुरस आहे.
चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने, यांच्यात चढाओढ बघायला मिळतंय. दोघांकडूनही पद मिळवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी जिल्हातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. मोठी रस्सीखेच शिंदे गटात बघायला मिळतंय. अमोल पाटील, गोकुळ गिते, सतजीत तांबे, अमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, मंजूळा गावित, तुळशीराम गावित यांनी पत्र दिले.
एकनाथ शिंदे आता या पत्रानंतर काही निर्णय नक्की घेतात, हे अगदी थोड्यावेळातच स्पष्ट होईल. या आमदारांचे पत्रही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे उपसभापती पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात टाकतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनंतर काही आमदारही शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.