Last Updated:
Lohgad Ketan Agarwal Murder Case Pune: सियाला केतन आवडत नव्हता, त्यामुळे कुटुंबाने जमवलेले लग्न तिला अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नाआधी होणारे प्री वेडिंग शूट सियाला अजिबातच करायचे नव्हते. परंतु थेटपणे नकार न देता तिने वेगळी चाल खेळली, तेच कार चालकाने बघितले. तोच कार चालक आता माध्यमांसमोर आला आहे.
अंनिस शेख, प्रतिनिधी, मावळ (पुणे) : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील मृत्यूने खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता. परंतु पुणे पोलिसांनी जेव्हा खोलात जाऊन तपास केला तेव्हा केतनची होणारी बायको सिया गोयल हिनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले. केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आता आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या कार चालकाने (कॅब ड्रायव्हर) काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
केतन अग्रवाल याचं लग्न सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची खरेदी सुरू होती. पण सियाच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. सियाचं विशी ओलांडलेलं वय आणि तिचं चेतन चौधरी याच्यावर असलेलं जीवापाड प्रेम! केतनशी लग्न करणं तिला अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नाआधी होणारे प्री वेडिंग शूट सियाला अजिबातच करायचे नव्हते. परंतु थेटपणे नकार न देता तिने चेतनचा पासपोर्ट लपविण्याचे किंवा लांबविण्याचे ठरवले.
मुंबई विमानतळावर जाण्याआधी फूडमॉलला नेमकं काय घडलं? कॅब ड्रायव्हरने सगळं डोळ्यांनी पाहिलं
मुंबई विमानतळावर जाण्याचा दिवस ठरला. त्यांनी कॅब बुक केली. सिया आणि तिचा भाऊ साहिल बुक केलेल्या गाडीत बसले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाले. काही वेळ त्यांच्यात भांडण सुरू होते, असे सियाला मुंबईला घेऊन जाणाऱ्या कॅब चालकाने सांगितले. काही वेळाने सिया आणि तिच्या भावाचे भांडण थांबले. त्याने मला गाडीमध्ये गाणी लावायला सांगितले. मी गाणी लावल्यावर साहिल माझ्या शेजारी पुढे येऊन बसला. त्यानंतर काही वेळाने अजून चार लोक गाडीत बसले. अखेर आम्ही मुंबईकडे जाण्यासाठी निघालो. लोणावळ्याच्या पुढे एका फूड मॉलमध्ये थांबल्यानंतर सिया गोयलने बॅगेतून काहीतरी वस्तू काढून ती खिशात ठेवली होती. मी हे पाहत असताना तिने माझ्याकडे पाहिलं. नंतर तिच्याकडे वळून पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही, असे कॅब चालक वैभव दत्तात्रेय जाधव याने सांगितले.
कॅब चालकाच्या या दाव्यामुळे तपास यंत्रणांचे लक्ष पुन्हा त्या प्रवासातील हालचालींकडे वळले आहे. पोलिसांनी यापूर्वी केलेल्या चौकशीत सिया गोयलने केतन अग्रवालचा पासपोर्ट फाडून तो वॉशरूममध्ये फेकून दिल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कॅब चालकाने पाहिलेली वस्तू आणि पासपोर्ट प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
फूड मॉल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम
प्रवासादरम्यान सिया गोयलच्या हालचाली, तिने भेट दिलेली ठिकाणे आणि तिच्याकडे असलेल्या वस्तूंची पडताळणी सुरू आहे. याशिवाय संबंधित फूड मॉल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कार चालकाच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण
केतन अग्रवाल हत्याकांडाने आधीच मोठी खळबळ उडवून दिली असताना आता कॅब चालकाच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सिया गोयलने नेमके काय लपवण्याचा प्रयत्न केला होता, याबाबत तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करत आहेत.
Pune,Maharashtra
