Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण…, पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर


सांगली: सांगली येथील विठ्ठलनगरमधील पोळ मळा परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती घरात अचानक बेशुद्ध पडल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा (Sangli Crime News) डाव पोलिसांनी अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. आनंद हणमंत सर्जे (वय ३८) असे मृत पतीचे नाव आहे. या निर्घृण हत्या (Sangli Crime News) प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृत आनंद यांची पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Sangli Crime News)

Sangli Crime News:  हॉस्पिटलमध्ये आणलं, पण डॉक्टरांच्या संशयाने ‘गेम’ उलटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास आनंद सर्जे हे घरात अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत पत्नी पल्लवी आणि तिच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. आनंद यांच्या मृत्यूबाबत संशय आल्यामुळे त्यांचा मृतदेह अधिक सखोल तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तिथे झालेल्या उत्तरीय तपासणीत (पोस्टमॉर्टम) आनंद यांच्या गळ्यावर संशयास्पद खुणा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.(Sangli Crime News)

Sangli Crime News:  ओढणीने पाय बांधले अन् झोपेतच संपवलं; पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

या संपूर्ण प्रकारानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना तीव्र संशय आला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी संशयाच्या आधारे पत्नी पल्लवी आणि तिचा मित्र दीपक आजमाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. “आनंद हा सतत दारू पिऊन छळ करायचा, या त्रासाला कंटाळून आम्ही दोघांनी त्याचा काटा काढायचा प्लॅन केला. २५ जूनच्या रात्री आनंद गाढ झोपेत असताना आम्ही ओढणीने त्याचे पाय घट्ट बांधले आणि त्यानंतर हाताने गळा दाबून त्याला जीवे मारले,” अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिली. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, संशयित आरोपी दीपक हा मृत आनंद यांचा जवळचा नातेवाईक असून ते दोघेही सांगलीतील एका नामांकित कपड्याच्या दुकानात एकत्र काम करत होते.

Sangli Crime News:  ३ महिन्यांचे निष्पाप बाळही आईसोबत पोलीस ठाण्यात

आरोपी पल्लवीला दोन लहान मुले आहेत; ज्यामध्ये एक तीन वर्षांचा मुलगा असून दुसरे अवघ्या तीन महिन्यांचे लहान बाळ आहे. पल्लवीला अटक झाल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मोठ्या मुलाला सांभाळण्यासाठी तिच्या बहिणीकडे पाठवण्यात आले आहे. मात्र, अवघ्या तीन महिन्यांचे लहान बाळ आईचे दूध पीत असल्याने सध्या त्याला पोलीस ठाण्यात आईसोबतच ठेवण्यात आले आहे. आईच्या गुन्ह्याची शिक्षा या निष्पाप जिवाला भोगावी लागत असल्याने पोलीस ठाण्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Sangli Crime News:  पतीच्या अंत्यविधीला गेली, तिथूनच पोलिसांनी उचललं!

मृत आनंद सर्जे हे मूळचे जत तालुक्यातील गुड्डापूर गावचे रहिवासी होते. मिरज सिव्हिलमधील उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नातेवाईक आनंद यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुड्डापूर येथे घेऊन गेले. पतीचा खून करूनही पल्लवी अत्यंत शांतपणे नातेवाईकांसोबत अंत्यविधीसाठी गुड्डापूरला गेली होती. मात्र, इकडे सांगलीत डॉक्टरांचा अहवाल आणि खुनाचा प्रकार उघडकीस येताच विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने थेट गुड्डापूर गाठले आणि अंत्यविधीच्या ठिकाणाहूनच पल्लवीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सांगली आणि जत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *