शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद


रायगड : महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून शिवभक्त येत असतात. रायगडावर दरवर्षी 6 जून रोजी मोठा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा देखील संपन्न होतो. त्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येतात. तर, वर्षभर किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचीही भेट असते. आता, या सर्व शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, किल्ले रायगडावर जाण्यासाठी आता नवीन रोपवे उभारला जाणार असून केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये शिवभक्तांना गडावर जाता येणार आहे. विशेष म्हणजे, हा सरकारी रोपवे असणार आहे, अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपती यांनी दिली. 

रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष आणि युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टद्वारे नवीन रोपवेबाबत माहिती दिली आहे. दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोप वे मधून साधारणता 350 रुपये आकारले जातात. मात्र हाच प्रवास आता केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत आपण दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत होतो त्यानंतर आता या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवीन शासकीय रोपवे उभारणीसाठी मान्यता मिळाली असल्याच त्यांनी सांगितलं. दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या नवीन अत्याधुनिक रोपवे उभारणीस पुरातत्व विभागाची मान्यता देण्यात आली असून सध्या आकारल्या जाणाऱ्या प्रतिव्यक्ती 350 रुपयांऐवजी केवळ 50 ते 100 रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. याचबरोबर, संवर्धनाच्या कामांसाठी सध्याच्या रोपवेकडून आकारल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली.  

सध्या प्रतिव्यक्ती 325 रुपये

दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खासगी मालकीच्या रोपवेकडून प्रतिव्यक्ती 325 रुपये भाडे आकारले जाते. तसेच रायगड विकास प्राधिकरणास संवर्धन कामांकरिता गडावर न्यावयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांना प्रतिकिलो 6.3 रुपये दर आकारणी केली जात असल्याने गडावरील कामांना सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च येत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अधिकृत व अत्याधुनिक रोपवे उभारण्यासाठी मंजुरी मिळावी याकरिता 2018 पासून छत्रपती संभाजीराजे नामदार नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते. त्यानुसार नुकतीच पुरातत्व विभागाकडून नवीन शासकीय रोपवे उभारणीस मान्यता मिळाल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.  

अवघ्या 100 रुपयांत रायगडावर  

रायगडावर जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या शासकीय रोपवेमध्ये प्रतिव्यक्ती कमाल 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दर आकारणी केली जाईल. तसेच, संवर्धनाकरिता लागणाऱ्या साहित्याची वाहतूक नाममात्र दराने अथवा तत्कालीन परिस्थितीनुसार शक्य असल्यास नि:शुल्क स्वरुपात केली जाईल. यामुळे संवर्धन कार्यात येणाऱ्या वाहतूक खर्चामध्ये कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. नवीन रोपवे निर्मितीचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष रोपवे उभारणीच्या कामास सुरुवात होईल, अशी देखील माहिती संभाजीराजेंनी दिली. 

हेही वाचा

परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *