Last Updated:
परीक्षा रद्द झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच लाखो उमेदवारांच्या मनात एकच धाकधूक सुरू झाली आहे की, आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार का? पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार का? याच प्रश्नाचे उत्तर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
मुंबई : रविवारी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) लाखो उमेदवारांनी रात्रंदिवस अभ्यास केला. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी आली आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ‘NEET’ नंतर आता ‘TET’चा पेपरही फुटल्याचे उघडकीस आले असून, ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. भिवंडीत मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पेपरफुटीचा संपूर्ण काळाबाजार समोर आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण असून, आता पुढे काय होणार? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उमेदवारांना पुन्हा नवी नोंदणी आणि नवं शुल्क लागणार का?
परीक्षा रद्द झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच लाखो उमेदवारांच्या मनात एकच धाकधूक सुरू झाली की, आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार का? पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार का? यावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट दिली आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, तसेच त्यांना पुन्हा कोणतेही नवीन शुल्क भरण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांचे हित आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षेची नवीन तारीख लवकरच शासनातर्फे अधिकृतपणे जाहीर केली जाईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
भिवंडीत मध्यरात्री काय घडलं? पेपरफुटीचा कसा झाला पर्दाफाश?
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथे काही संशयित इसमांकडे २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रात्रीच त्या ठिकाणी धाड टाकली आणि संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेची सत्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावण्यात आले. जेव्हा अधिकाऱ्यांनी पडताळणी केली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न हे प्रत्यक्ष रविवारी येणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
Mumbai,Maharashtra
Jun 27, 2026 10:24 PM IST
