Last Updated:
रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्यासोबत पैशांचा मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. त्यांनी संबंधित डॉक्टरला बिनव्याजी पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही डॉक्टरने पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव, पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र महाजन असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी रवींद्र महाजन यांनी एक व्हिडिओ बनवला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आर्थिक व्यवहार आणि वाद
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्यासोबत पैशांचा मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. त्यांनी संबंधित डॉक्टरला बिनव्याजी पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही डॉक्टरने पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला. या आर्थिक व्यवहाराच्या वादातूनच रवींद्र यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे व्हायरल व्हिडीओतून ते सांगत आहेत.
डॉक्टरावर चाकूने हल्ला, व्हायरल व्हिडीओत काय?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैशांच्या वादावरून रवींद्र महाजन आणि डॉक्टर समाधान पाटील यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या महाजन यांनी डॉक्टर समाधान पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये डॉक्टरच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात डॉक्टर पाटील थोडक्यात बचावले. या घटनेचा उल्लेख रवींद्र महाजन यांनी स्वतः आपल्या मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओमध्ये केला आहे. मी डॉक्टरला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले.
‘माझ्या खानदानाची जबाबदारी त्याच्यावर…’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रवींद्र महाजन अत्यंत भावूक आणि संतप्त झालेले होते. त्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. माझ्यानंतर माझ्या संपूर्ण खानदानाची जबाबदारी आता त्याच डॉक्टरवर राहील. मला शासनाने आणि पोलिसांनी न्याय द्यावा, अशी आर्त हाक त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी नगरदेवळा स्थानकाजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
पोलिसांचा तपास सुरू
व्हिडिओतील आरोपांच्या आधारे संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी केली असून घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
Jalgaon,Maharashtra
