Last Updated:
सिया आणि चेतनच्या लग्नाबद्दल सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर या हाय-प्रोफाइल लग्नाच्या बजेटवरून, विमानांच्या बुकिंगवरून आणि कोट्यवधींच्या खर्चावरून अनेक चर्चा रंगत आहेत.
पुणे : लोहगड किल्ल्यावरील घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाने अख्ख्या देशाला हादरवून सोडलं आहे. एका 20 वर्षाच्या तरुणीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून केलेल्या या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर या हाय-प्रोफाइल लग्नाच्या बजेटवरून, विमानांच्या बुकिंगवरून आणि कोट्यवधींच्या खर्चावरून अनेक चर्चा रंगत आहेत. या सर्व चर्चांवर आता मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल आणि आई प्रिया गोयल यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे तोंड उघडले असून सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
माध्यमांशी बोलताना सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “आमची आर्थिक क्षमता १७ कोटी रुपये खर्च करण्याची अजिबात नाही. सोशल मीडियावर ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. आम्ही उदयपूरमधील ‘अंतरतारी रिसॉर्ट’ बुक केले होते. लग्नासाठी येणारे पाहुणे पुणे ते अहमदाबाद फ्लाइटने आणि तिथून पुढे कारने हॉटेलवर जाणार होते. आमच्या बाजूने लग्नाचा एकूण खर्च फक्त ३ कोटी रुपयांपर्यंतच होणार होता.”
लग्नाच्या तयारीत अग्रवाल कुटुंबाने सियाला दिलेले सोन्या-चांदीचे दागिने गोयल कुटुंबाने परत केले होते. यावर खुलासा करताना सियाची आई प्रिया गोयल यांनी सांगितले की, “ज्यावेळी केतनच्या कुटुंबाने दागिने दिले, त्यावेळी आमच्या घराचे नूतनीकरण सुरू होते. घरात १० ते १२ मजूर काम करत होते. सुरक्षेच्या कारणास्तव इतके मौल्यवान दागिने घरात ठेवणे आम्हाला योग्य वाटले नाही, म्हणूनच आम्ही ते दागिने सुरक्षिततेसाठी त्यांना परत केले होते. आमच्याकडे फक्त साखरपुड्याच्या विधीदरम्यान दिलेले एक ब्रेसलेट आणि एक अंगठीच ठेवली होती.”
सिया केतनला जबरदस्ती लोहगडावर घेऊन गेली या आरोपावर पलटवार करताना तिच्या आईने सांगितले की, सियाला कधीच तिथे जायचे नव्हते. उलट, १९ जून रोजी ते सर्वजण महाबळेश्वरला जाणार होते. त्यामुळे लोहगडावर जाऊन थकवा येईल म्हणून सियाने जाण्यास नकार दिला होता. सियाने नकार दिल्याचा चॅटचा स्क्रीनशॉटही दाखवला होता. उलट केतनच्या आईनेच स्वतः व्हिडिओ कॉल करून लोहगडावर जाण्यासाठी तगादा लावला होता, असा दावाही त्यांनी केला.
चेतन चौधरीसोबत असलेल्या सियाच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलताना गोयल दांपत्य भावूक झाले. त्यांनी सांगितले की, सियाचे कोणासोबत अफेअर असेल, अशी त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. लग्न ठरवण्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी सियाला तिच्या आवडीबद्दल विचारले होते. त्यावर सियाने, “मी या लग्नामुळे खूप आनंदी आहे आणि तुमची इच्छा हीच माझी इच्छा आहे,” असे उत्तर दिले होते.
अग्रवाल कुटुंबाने लावलेल्या आरोपांवर आता सियाच्या पालकांनी केलेल्या या थेट खुलाशामुळे या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Pune,Maharashtra
Jun 27, 2026 11:31 AM IST
Ketan Agarwal: 17 कोटी नाही, लग्नासाठी होणार होता ‘इतका’ खर्च; केतनच्या घरच्यांनी दिलेल्या सियाच्या दागिन्यांचं काय झालं?
