90 च्या दशकातील सुपरहिट गाणं, जे ऐकताच आजही ठेका धरतात लोक, सुरुवातीला उर्मिला मातोंडकरने दिलेला नकार – Marathi News | 90s Most Iconic Song Chamma Chamma Sung By Alka Yagnik


बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाबरोबरच दमदार नृत्यशैलीमुळेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘रंगीला गर्ल’ आणि ‘छम्मा छम्मा गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या उर्मिलाच्या कारकिर्दीतील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, या सुपरहिट गाण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नकार देण्याचा निर्णय घेतला होता, असा धक्कादायक खुलासा त्यांनी नुकताच केला.

अलीकडेच उर्मिला मातोंडकर या India’s Best Dancer या कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘छम्मा छम्मा’ गाण्याच्या चित्रीकरणाशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, जेव्हा मला China Gate या चित्रपटातील ‘छम्मा छम्मा’ गाण्याची ऑफर मिळाली आणि हे राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातील गाणे असल्याचे सांगण्यात आले, तेव्हा मी ते करण्यास जवळपास नकार दिला होता. त्या काळात चित्रपटसृष्टीत ‘आयटम साँग’कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे अशा प्रकारच्या गाण्यात काम करण्याबाबत त्या सुरुवातीला साशंक होत्या.

राजकुमार संतोषी यांनी बदलला विचार

उर्मिला यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, पूर्वीही काही अशी गाणी झाली आहेत जी वर्षानुवर्षे लोकांच्या आठवणीत राहिली आहेत. ‘छम्मा छम्मा’ हेही असेच एक गाणे व्हावे, जे प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहील, अशी त्यांची इच्छा होती. संतोषी यांच्या या शब्दांमुळे आपला दृष्टिकोन बदलला आणि त्यानंतर आपण हे गाणे करण्याचा निर्णय घेतल्याचे उर्मिला यांनी सांगितले.

उर्मिला यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाशी संबंधित आणखी एक रंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना विचारले होते की, हे गाणे पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील. त्यावर गणेश आचार्य यांनी अंदाजे 12 दिवस लागतील असे सांगितले होते. मात्र संपूर्ण टीमचे नियोजन, मेहनत आणि उत्तम समन्वय यामुळे एवढ्या मोठ्या गाण्याचे चित्रीकरण अवघ्या तीन दिवसांत पूर्ण झाले.

आजही कायम आहे ‘छम्मा छम्मा’ची लोकप्रियता

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या China Gate या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यातील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे प्रचंड गाजले. उर्मिला मातोंडकर यांच्या आकर्षक नृत्याने आणि दमदार सादरीकरणाने हे गाणे प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *