Voter List Revision : पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालच्या मतदार यादीशी नाव जुळवून पाहा; राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?


Maharashtra Voter List Revision : राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केलं जाणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी दिलं. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार असून त्यामध्ये आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का हे पाहण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

राज्यातील एसआयआर प्रक्रिया ही 29 जुलै पर्यंत सुरू राहणार असून मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच बीएलओ घरी आल्यानंतर कुणी उपस्थित नसेल तर त्यांना 29 जुलै नंतरही त्यांचे नाव नोंदवता येणार असल्याचं चोकलिंगम म्हणाले. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेतंर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष घरसमान पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेवर महाविकास आघाडीने (MVA) गंभीर आक्षेप घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे.

एस. चोकलिंगम यांनी सांगितले की, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही. या कामासाठी राज्यात तब्बल 1 लाख 253 बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणनेचे काम संपल्यावर लगेचच या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

BLO Door To Door Survey : 1 लाखांहून अधिक BLO घराघरांमध्ये जाणार

राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या तपशिलाची खातरजमा केली जात आहे. यासाठी 1 लाखांहून अधिक बीएलओ कर्मचारी घराघरात जाऊन पडताळणी करणे, डुप्लिकेट नावे शोधणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट करणे आणि जुन्या याद्यांशी मॅपिंग करण्याचं काम करणार आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी रि-डेव्हलपमेंट सुरू असल्याने जे नागरिक दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावा, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

Voter ID Self Mapping : ऑनलाईन ‘Self-Mapping’ चा पर्याय उपलब्ध

मुंबई आणि इतर मोठ्या शहरी भागांमध्ये संथ गतीने काम होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांना एक मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती डिजिटल पद्धतीने अपडेट करता यावी, यासाठी आयोगाने ‘Online Self-Mapping’ चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बीएलओच्या पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना त्यांची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल, ज्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.

Election Commission Schedule : मतदार यादी पुनरीक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक

20 ते 29 जून 2026 : गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

30 जून ते 29 जुलै 2026 : मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील.

5 ऑगस्ट 2026 : प्रारूप मतदार याद्यांची (Draft Voter List) अधिकृत प्रसिद्धी केली जाईल.

5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 : मतदारांना प्रारूप यादीवर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील.

3 ऑक्टोबर 2026 पर्यंत : प्राप्त झालेले सर्व दावे आणि हरकती निकालात काढल्या जातील.

7 ऑक्टोबर 2026 : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी (Final Voter List) प्रसिद्ध केली जाईल.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *