संजू राठोडचा बॉलिवूडमध्ये डंका! नव्या ढंगात वाजणार ‘गुलाबी साडी’, गाण्यावर रितेश देशमुखचा जबरा डान्स; VIDEO VIRAL | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Gulabi Sadi Hindi remake: सुपरस्टार अजय देवगणची बहुप्रतीक्षित कॉमेडी फिल्म ‘धमाल ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, या चित्रपटात ‘गुलाबी साडी’ या गाण्याचे हिंदी व्हर्जन रीक्रिएट करण्यात आले आहे.

News18
News18

मुंबई: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका मराठी गाण्याने धुमाकूळ घातला होता. हे गाणं म्हणजे, ‘गुलाबी साडी’. ७० वर्षांच्या आजीबाईंपासून ते मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच या गाण्याच्या हुकस्टेप्सने अक्षरशः वेड लावले होते. या गाण्याची इतकी क्रेझ होती की, ‘फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४’ च्या भव्य मंचावरही या गाण्याची जादू पाहायला मिळाली. पण आता या गाण्याची हवा थेट बॉलिवूडच्या एका मोठ्या चित्रपटात पोहोचली आहे. सुपरस्टार अजय देवगणची बहुप्रतीक्षित कॉमेडी फिल्म ‘धमाल ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, या चित्रपटात ‘गुलाबी साडी’ या गाण्याचे हिंदी व्हर्जन रीक्रिएट करण्यात आले आहे.

रितेश देशमुख आणि अंजली आनंदचा नखरा

काही दिवसांपूर्वीच ‘धमाल ४’ चा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याने प्रेक्षकांना हसवून हसवून पुरते हैराण केले. आता या चित्रपटातील ‘गुलाबी साडी’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले असून, यात मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद थिरकताना दिसत आहेत. संजू राठोडच्या मूळ गाण्याचा गावरान आणि अस्सल ठसका कायम ठेवत याला बॉलिवूडचा तडका देण्यात आला आहे. गाण्याच्या थीमप्रमाणे अंजलीने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, तर रितेश पांढऱ्या रंगाच्या स्टाईलिश सूटमध्ये एकदम कडक दिसतोय. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि डान्स पाहून चाहते फिदा झाले आहेत.

संजू राठोडचा बॉलिवूडमध्ये डंका

अनेकदा मूळ मराठी गाणे हिंदीत रीक्रिएट करताना त्याचा बाज बदलतो; मात्र मेकर्सनी मूळ गायक संजू राठोड यालाच या हिंदी गाण्याची धुरा दिली आहे. संजूने आपल्या धमाकेदार आवाजात हे गाणे गायले असून, प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागचीसोबत मिळून याचे संगीत तयार केले आहे. तर या गाण्याचे हिंदी बोल कुमार यांनी लिहिले आहेत. मराठी मातीतील एका गाण्याला बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात इतके मोठे स्थान मिळाल्यामुळे संजू राठोडवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

१० जुलैला रिलीज होणार ‘धमाल ४’

हा चित्रपट येत्या १० जुलै २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासोबत अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवी किशन आणि संजीदा शेख अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

संजू राठोडचा बॉलिवूडमध्ये डंका! नव्या ढंगात वाजणार ‘गुलाबी साडी’, गाण्यावर रितेश देशमुखचा जबरा डान्स; VIDEO VIRAL



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *