Last Updated:
Air India Flight : एअर इंडियाचे (Air India) एक विमान दिल्लीहून अमृतसरला जात असताना थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली: एअर इंडियाचे (Air India) एक विमान दिल्लीहून अमृतसरला जात असताना थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. २२ जून रोजी रात्री घडलेल्या या घटनेत विमानात २०० हून अधिक प्रवासी स्वार होते. अमृतसर विमानतळावर उतरण्याऐवजी हे विमान थेट पाकिस्तानमधील लाहोरपर्यंत पोहोचले होते. पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) संपर्क साधल्यानंतर पायलटने विमान यु-टर्न घेतले. एअर इंडियाचे विमान असे भरकटल्याने विमानातील २०० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
दिल्लीहून उड्डाण, थेट लाहोर एटीसीचा संपर्क!
एअर इंडियाचे फ्लाइट AI-479 ने सोमवार, २२ जून रोजी रात्री ९:१५ वाजता दिल्ली विमानतळावरून अमृतसरसाठी उड्डाण केले. अमृतसरच्या आकाशात पोहोचल्यानंतर विमानाने काही फेऱ्या मारल्या, पण ते तिथे लँड होऊ शकले नाही. काही वेळातच हे विमान भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत (Air Space) घुसले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान थेट लाहोर शहराच्या जवळ पोहोचले होते. आपण पाकिस्तानच्या हद्दीत आलो आहोत, याची पुसटशी कल्पनाही पायलटना नव्हती. जेव्हा लाहोर एटीसीने विमानाशी संपर्क साधून “तुम्ही पाकिस्तानच्या हद्दीत काय करत आहात?” अशी विचारणा केली, तेव्हा पायलट्सचे धाबे दणाणले.
अमृतसरमध्ये लँडिंग नाकारले अन्…
चूक लक्षात आल्यानंतर पायलटने तातडीने हवेतच यु-टर्न घेतला आणि विमान पुन्हा भारताच्या दिशेने वळवले. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव अमृतसर विमानतळाने या विमानाला लँडिंगची परवानगी दिली नाही. परिणामी, वैमानिकाला हे विमान घेऊन पुन्हा दिल्ली विमानतळावर परतावे लागले. दिल्लीत प्रवाशांना उतरवून रात्री १ वाजेच्या सुमारास हे विमान पुन्हा अमृतसरसाठी रवाना करण्यात आले.
डीजीसीएने (DGCA) काय म्हटले?
या गंभीर घटनेनंतर विमान वाहतूक नियामक संस्था ‘डीजीसीए’ने (DGCA) अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. DGCA ने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “२२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अमृतसर विमानतळावर उतरताना पक्षाची धडक (Bird Hit) बसली होती. यामुळे धावपट्टीच्या (Runway) तपासणीसाठी विमानाला हवेतच थांबण्यास सांगण्यात आले. रडारच्या तांत्रिक वळणामुळे (Radar Vectoring) विमान काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेले होते. याबाबत पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण कक्षाला माहिती असल्याचे सांगण्यात आले.
दोषींवर तातडीने निलंबनाची कारवाई
विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाणे ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने डीजीसीएने याची गंभीर दखल घेतली आहे. ही घटना तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवल्याबद्दल अमृतसर विमानतळावरील संबंधित एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) आणि विमानातील ऑपरेटिंग क्रू (पायलट्स) यांच्यावर अंतरिम निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
New Delhi,Delhi
Air India Flight: एअर इंडियाचं विमान पाकिस्तानात! अमृतसर सोडून थेट लाहोर गाठले, २०० प्रवाशांचा जीव टांगणीला, नेमकं काय घडलं?
