उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सहा खासदारांनी लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल दोन वर्षांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या विरोधात राहून सर्वसामान्यांची कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगून निधीच्या कमतरतेमुळे आम्हाला निर्णय घेणे भाग होते, असा एकंदर सूर शिवसेनेच्या सहाही खासदारांचा होता.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या प्रत्येक खासदाराची विशेष ओळख करून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी, मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदारांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार चालणारा आपला पक्ष आहे. म्हणूनच सहा खासदारांनी आपल्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेतला. जून २०२२ साली आपण उठाव केला, आता चार वर्षांनंतर आपण षटकार मारला आहे. काही लोक उलट सुलट चर्चा करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, आम्ही कुणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, शिवसेना वाढविण्यासाठी एकत्र आलो. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, आमच्याही कुणी नादी लागू नये. आमच्यासाठी हिंदुत्वाचा विचारधारा महत्त्वाची आहे आणि आपला अजेंडा विकास हाच आहे. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे.
सहा खासदारांच्या मतदारसंघातील कामे, प्रश्न, प्रकल्प प्रामाणिकपणे सोडवेन, हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे. मी दिलेला शब्द पाळतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे. इथे कुणी मालक नाही, आपण सगळे सहकारी आहोत, सहकारी म्हणूनच काम करतो. एकनाथ शिंदे हा तुमच्याशी कार्यकर्ता म्हणूनच वागेन, मालक म्हणून नाही. तुमचा आदर सन्मान करेन, तुमच्या कार्यकर्त्यांचा आदर सन्मान करेन, कुठेही अनादर होऊ देणार नाही.
ज्या विश्वासाने आपण सोबत आला आहात, त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. राज्य आणि केंद्राशी निगडित प्रश्न सोडवू, कुठेही काही अडचण येणार नाही, याची मी काळजी घेईन. आपल्याला शिवसेना वाढवायची आहे, गावागावात-घराघरात पोहोचवायची आहे.
कोणत्या सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला?
ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील या खासदारांनी अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केला.
नंदनवनला शिंदेंच्या खासदारांची बैठक, इकडे उद्धव ठाकरे सावध, ‘शिवालय’ला आमदारांची बैठक
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर उद्धव ठाकरे सावध झाले. आमदारांनी असे कोणतेही पाऊल उचलू नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या २० आमदारांपैकी १७ आमदार हजर होते तर विधान परिषदेच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी बैठकीला उपस्थिती लावली. आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक विषय आणि विधिमंडळाच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.