Gujarat Titans vs Chennai Super Kings IPL 2026 : 18 वर्षं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर संपला. अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सने 50 धावांनी पराभव करत CSKच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकत चाहत्यांची निराशा केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफची सवय लावणारी ही टीम यंदा मात्र संघर्ष करताना दिसली. धोनीच्या सावलीत वाढलेला हा संघ बाहेर पडताना चाहत्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा भावनांचा पूर आणून गेला.
शुभमन गिल आणि साई सुदर्शनचा पुन्हा धमाका!
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यासोबत डावाची सुरुवात केली. सुरुवातीला, साई सुदर्शन एका टोकाकडून खेळत होता, तर गिलने दुसऱ्या बाजूने चेन्नईच्या गोलंदाजांना चोपले. मात्र, स्पेन्सर जॉन्सनने शुभमन गिलला बाद करून गुजरातला पहिले यश मिळवून दिले. गिलने 37 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 3 षटकारांसह 64 धावा केल्या. गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. त्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची शानदार भागीदारी करून गुजरातचा डाव सावरला. साई सुदर्शनने 53 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. जोस बटलर 27 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला.
पराभवानंतर कर्णधार ऋतुराज काय म्हणाला?
प्रत्युत्तरात, चेन्नईचा संघ 13.4 षटकांत 140 धावांवर सर्वबाद झाला. शिवम दुबेने 17 चेंडूंत 47 धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. सिराज, रबाडा आणि रशीद खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पराभवानंतर कर्णधार ऋतुराज म्हणाला की, “सामन्यात जे काही आव्हान असेल, त्याचा आम्हांला शक्य तितक्या लवकर पाठलाग करायचा होता. जेव्हा तुम्ही 230 धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा समोरच्या तगड्या गोलंदाजीसमोर ते अजिबात सोपे नसते. आम्ही सर्वस्व पणाला लावून एक शेवटचा प्रयत्न केला, पण त्यांचे कौतुक करायला हवे.
पुढे तो म्हणाला, हा हंगाम आमच्यासाठी कठीण राहिला, विशेषतः लागोपाठ तीन सामने गमावल्यानंतर. आम्ही आमची लय शोधली, योग्य खेळाडू योग्य ठिकाणी सेट केले, पण दुखापतींमुळे आम्हांला मोठा फटका बसला. ओव्हरटन बाहेर गेल्यामुळे आमचे संतुलन बिघडले, शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला एक फलंदाज किंवा एका गोलंदाजाची कमतरता प्रकर्षाने जाणवली. 8 पेक्षा जास्त खेळाडूंनी 20 पेक्षा कमी सामने खेळले आहेत, त्यामुळे आम्ही नेमके कुठे कमी पडतोय हे आता आम्हांला समजले आहे. तरीही, आम्ही घराबाहेर (away wins) 6 सामने जिंकलो, मला माझ्या संघाचा अभिमान आहे. हैदराबादमध्ये आमच्याकडून चूक झाली आणि चेन्नईमध्ये आम्ही त्यांना रोखू शकलो नाही. आम्ही ते करू शकलो नाही, पण तरीही मला अभिमान आहे.
चेन्नईचा प्रवास; आशा, संघर्ष अन् शेवटी चाहत्यांची निराशा (Chennai Super Kings IPL 2026)
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला ठरला. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही CSK कडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र मैदानावरील अस्थिर कामगिरीमुळे संघाला सातत्य राखता आलं नाही. काही सामन्यांमध्ये चेन्नईने दमदार पुनरागमन करत चाहत्यांना आनंद दिला, पण निर्णायक क्षणी झालेल्या चुका संघाला महागात पडल्या. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरला. या सीझनमधील सर्वात मोठा धक्का म्हणजे दिग्गज खेळाडू MS धोनीची अनुपस्थिती. धोनी मैदानावर नसल्यामुळे चाहत्यांमध्ये वेगळीच निराशा होती. स्टेडियममध्ये ‘धोनी…धोनी’च्या घोषणा होत होत्या, पण चाहत्यांना त्यांचा आवडता फिनिशर मैदानात पाहायला मिळाला नाही. मधल्या टप्प्यात चेन्नईने सलग विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत दमदार पुनरागमन केलं होतं. मात्र काही महत्त्वाच्या सामन्यांतील पराभवांमुळे संघाचं गणित बिघडलं. गुजरातविरुद्ध पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 मधून बाहेर गेला.
हे ही वाचा –
आणखी वाचा