रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवण – Marathi News | Rohit Sharma and Kohli photo goes viral on social media claims Virat was distressed by news of retirement


रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवणImage Credit source: X

भारत इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील सामना निर्णायक ठरणार आहे. पण हा सामना रोहित शर्मासाठीही खास असल्याचं बोललं जात आहे. कारण रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची वनडे मालिका असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग नसेल, असंही त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली. या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरू लागल्यानंतर सर्वांच्या नजरा या कार्डिफच्या मैदानातील बालकनीकडे लागल्या होत्या. रोहित शर्मा 26 धावा करून तंबूत परतला. थोड्या वेळाने विराट कोहली अर्धशतकी खेळी करून आला आणि त्याच्या बाजूला बसला. एकीकडे भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना दुसरीकडे, रोहित शर्माच्या बाजूला विराट कोहली उदास चेहऱ्याने बसल्याचं दिसून आलं. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावरील हावभावही बरंच काही सांगून जात होते. विराट कोहली खिन्न असण्याचं कारण रोहित शर्माची निवृत्ती असल्याचं चाहते सांगत आहेत.

आर अश्विनच्या निवृत्तीचा दिवस आठवला

विराट कोहलीचा पडलेला चेहरा पाहून क्रिकेट चाहत्यांच्या 2024 या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या. या वर्षाच्या शेवटी दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आर अश्विनने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. या घोषणेपूर्वी तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ड्रेसिंग रूमधील विराट कोहली आणि आर अश्विनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाही विराट कोहली असाच खिन्न चेहऱ्याने वावरत होता. त्यानंतर त्याने अश्विनची गळाभेट घेतली होती. या व्हिडीओनंतर विराट कोहलीला आर अश्विनच्या निवृत्तीची माहिती आधीच मिळाली होती, असा दावा केला गेला. त्यामुळे भावुक झाल्याचं सांगितलं गेलं.

विराट कोहली खिन्न असण्याचं कारण काय?

व्हायरल होत असलेल्या फोटोवरून क्रीडाप्रेमी आपआपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहे. गेली अनेक वर्षे एकत्र खेळल्यानंतर जोडीदार निवृत्ती घेत असल्याने विराट भावुक झाल्याचं अनेक जण सांगत आहेत. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. त्यामुळे या एका वर्षात संघ बांधायचा आहे. त्यात रोहित शर्माचा फॉर्म, फिटनेस आणि टीम इंडियाकडे असलेले पर्याय पाहता त्याला संधी मिळणं कठीण आहे. आता लॉर्ड्सवर रोहित शर्मा खरंच शेवटचा सामना खेळणार का? कि निवृत्तीच्या बातम्यांना पूर्णविराम लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *