घरात नोटांचे बंडल, 49 प्लॉट, 3 आलिशान फार्महाऊस, किलोभर सोने जप्त; सर्वात मोठी रेड; सरकारी अधिकाऱ्याकडे सापडला कुबेराचा खजिना | बिझनेस


Last Updated:

एका सरकारी अभियंत्याकडे उत्पन्नापेक्षा अनेकपटीने जास्त मालमत्ता आढळून आल्याने विजिलन्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. 49 प्लॉट, तीन आलिशान फार्महाऊस आणि किलोभर सोन्याच्या दागिन्यांसह कोट्यवधींची संपत्ती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

News18
News18

भुवनेश्वर: ओडिशामध्ये विजिलन्स विभागाच्या धडक कारवाईनंतर एका सरकारी अभियंत्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 49 महागडे प्लॉट, 14 एकर परिसरात पसरलेली तीन आलिशान फार्महाऊस आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

हे प्रकरण कोरापुट जिल्ह्यातील कोटपाडा ब्लॉकमधील आहे. येथे कार्यरत असलेले सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer – AEE) सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

उत्पन्नापेक्षा अनेकपटीने जास्त मालमत्ता

तपासादरम्यान सेठी यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्न स्रोतांपेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता आढळून आली. यामध्ये दोन फ्लॅट्सचाही समावेश आहे. त्यापैकी एक फ्लॅट कथितपणे बेनामी असल्याचे तपासात समोर आले आहे.

विजिलन्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये

14 एकर क्षेत्रात पसरलेली 3 फार्महाऊस

49 प्लॉट

940 ग्रॅम सोन्याचे दागिने

2.5 किलो चांदी

5.48 लाख रुपये रोख रक्कम

60.92 लाख रुपयांहून अधिक बँक ठेवी

एक चारचाकी वाहन (कथित बेनामी)

7 डीएसपी आणि 9 निरीक्षकांच्या पथकाची कारवाई

या छाप्यासाठी ओडिशा विजिलन्स विभागाने सात विशेष पथके तयार केली होती. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व सात डीएसपी (Deputy Superintendent of Police) करत होते. पथकांमध्ये 9 निरीक्षक (Inspectors), 11 एएसआय (Assistant Sub-Inspectors) आणि इतर कर्मचारी सहभागी होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की या मालमत्तेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात सेठी अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 2018 (Prevention of Corruption Act, 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7,100 रुपयांच्या पगारापासून सुरुवात

सत्यनारायण सेठी यांनी 1998 मध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मासिक पगार केवळ 7,100 रुपये होता. यानंतर 17 वर्षांच्या सेवेनंतर 2015 मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता (Assistant Engineer – AE) पदावर पदोन्नती झाली आणि त्यांची कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली.

जून 2020 मध्ये त्यांची बदली बोरिगुमा ब्लॉकमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये त्यांना सहाय्यक कार्यकारी अभियंता (AEE) या वरिष्ठ पदावर बढती मिळाली. बढतीनंतर त्यांची पुन्हा कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता विजिलन्स विभागाच्या कारवाईनंतर त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/मनी/

घरात नोटांचे बंडल, 49 प्लॉट, 3 आलिशान फार्महाऊस, किलोभर सोने जप्त; सर्वात मोठी रेड; सरकारी अधिकाऱ्याकडे सापडला कुबेराचा खजिना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *