Last Updated:
Karad News: सुरेखा कणसे या आपल्या घरासमोर कुटुंबीयांसमवेत कपडे धुण्याचे काम करत होत्या.
विशाल पाटील, प्रतिनिधी, कराड (सातारा) : इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक एक भलामोठा सिमेंटचा पिलर अंगावर कोसळल्याने एका ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील विंग येथे घडली आहे. या घटनेमुळे विंग परिसर आणि मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुरेखा संतोष कणसे (वय ४०, रा. विंग, ता. कराड) असे मृत महिलेचे नाव आहे.
घरासमोर कपडे धुताना काळाचा घाला
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कराड तालुक्यातील विंग येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सुरेखा कणसे या आपल्या घरासमोर कुटुंबीयांसमवेत कपडे धुण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेला सुमारे १० फूट उंचीचा सिमेंटचा पिलर अचानक मोठ्या आवाजासह सुरेखा यांच्या अंगावर कोसळला.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
पिलर थेट अंगावर पडल्याने सुरेखा या गंभीर जखमी झाल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. हा भीषण अपघात पाहताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Satara,Maharashtra
Jun 20, 2026 10:27 PM IST
