नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं(Cockroach Janta Party) एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आलं होतं. यानंतर अभिजीत दीपके (Abhijeet Dipake) यांनी नवं एक्स खातं सुरु केल्याची माहिती दिली आहे. कॉकरोच इज बॅक या नावानं एक्स खातं सुरु केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
कॉकरोच जनता पार्टीचं नवं एक्स खातं सुरु
अभिजीत दीपके म्हणाले की कॉकरोज इज बॅक नावानं नवं खातं सुरु केलं आहे. टीम या प्रकरणाला कायदेशीर रुपात पुढं नेणार आहे. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत नव्या खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 35 हजार झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जुन्या एक्स खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 1 हजार इतकी होती.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात वकिलाला फटकारलं होतं. त्यावेळी त्यांनी वापरलेले परजीवी आणि कॉकरोच शब्दांमुळं वाद निर्माण झाला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाचे सन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलं होतं. सूर्यकांत यांनी त्यांचं वक्तव्य प्रामुख्यान बोगस डिग्रीधारकांसाठी होतं, बोगस डिग्री मिळवून वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांबाबत होतं असं म्हटलं होतं.
सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर 15 मे रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना अभिजीत दीपके यानं केली होती. या पार्टीची चर्चा राजकीय नेते, कार्यकर्ते, कलाकार आणि तरुणांमध्ये सुरु आहे. या पार्टीच्या सोशल मीडिया पेजेसला युवकांचं समर्थन मिळाल्याचं दिसून येतं. आज कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं बंद झालं आहे. मात्र, त्यानंतर नवं पेज काढण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामवर 1 कोटी 45 लाख फॉलोअर्स आहेत. या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.
कॉकरोच जनता पार्टीबद्दल योगेंद्र यादव काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं बॅन केल्याबद्दल बोलताना योगेंद्र यादव म्हणाले की हे लोक ज्या प्रकारे बाहेरुन जितके बळकट असल्याचं दाखवतात ते आतून कमजोर आहेत, घाबरले आहेत. ही एक चळवळ आहे, कॉकरोचच्या चिन्हामागं देशातील तरुण आहेत, तरुणी आहेत आणि त्यांचा राग आहे. आज आपण त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, असं योगेंद्र यादव म्हणाले.
योगेंद्र यादव यांनी लोकांनी कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करावं असं म्हटलं. ते म्हणाले की ही मोठी सुरुवात आहे. फक्त अशी कोणतीही कृती करु नका ज्यामुळं सरकारला संधी मिळेल. सरकार संधीच्या शोधात असून त्यांना आपण कारण देऊ नये, असंही योगेंद्र यादव म्हणाले.
आणखी वाचा