Last Updated:
Aamir Khan Sonam Wangchuk controversy: आमिरने “मी सोनम वांगचुक यांना ओळखतच नव्हतो,” असा दावा केला होता. पण, त्याचा हा दावा किती फोल आहे, हे उघड करणारा सोनम वांगचुक यांचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
मुंबई: नेहमी वेगवेगळ्या प्रश्नांना आपल्या सिनेमाच्या माध्यमातून वाट मोकळी करून देणारा आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट मानला जाणारा आमीर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, यंदा तो वादात येण्याचं कारण त्याचं तिसरं लग्न नसून त्याने पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आहे.
लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्याने “मी सोनम वांगचुक यांना ओळखतच नव्हतो आणि ‘३ इडियट्स’मधील रॅन्चो त्यांच्यावर आधारित नाही,” असा दावा केला होता. पण, आमीरचा हा दावा किती फोल आहे, हे उघड करणारा सोनम वांगचुक यांचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओने चाहत्यांना मोठा धक्का दिला असून, आमीर खानने जगासमोर उघडपणे खोटे सांगितले का? असा थेट सवाल आता विचारला जात आहे.
२००८ चा जुना व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक स्वतः या संपूर्ण पडद्यामागच्या कथेचा खुलासा करताना दिसत आहेत. वांगचुक यांनी सांगितले की, चित्रपट रिलीज होण्याच्या एक वर्ष आधी, म्हणजेच २००८ मध्ये त्यांची मुंबईतील एका कार्यक्रमात आमीर खानशी सविस्तर भेट झाली होती. त्यावेळी वांगचुक यांनी आमीरला एका सिनेमाची आयडिया दिली होती. ते म्हणाले होते, “भारत-पाकिस्तान रोज कोट्यवधी रुपये खर्च करून सियाचीनच्या बर्फाळ तुकड्यासाठी लढत आहेत, यावर आपण चित्रपट बनवू शकतो का? दोन्ही देशांतील सामान्य जनता हा वाद मिटवते आणि तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो, असे आपण दाखवू शकतो.” आमीरने ही आयडिया अत्यंत उत्सुकतेने ऐकली होती आणि वांगचुक यांच्या कामाचे एक ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनही पाहिले होते.
या भेटीनंतर वांगचुक उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला निघून गेले. पण डिसेंबर २००९ मध्ये जेव्हा ‘३ इडियट्स’ रिलीज झाला, तेव्हा त्यांना जगभरातून फोन आणि मेसेजेस यायला लागले. लोक म्हणत होते, “तुमच्यावर आणि लडाखमधील तुमच्या शाळेवर बनलेला सिनेमा अप्रतिम आहे.” हे ऐकून वांगचुक चक्रावले. त्यांनी लडाखमधील आपल्या शाळेत चौकशी केली तेव्हा समजले की, २००८ च्या ऑगस्ट महिन्यात एका मोठ्या सिनेमाची क्रू तिथे शूटिंगसाठी आली होती. मात्र, त्यांच्यासोबत प्लास्टिक कचरा असल्याने वांगचुक यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे नंतर या टीमने शेजारील दुसऱ्या शाळेत जाऊन शूटिंग पूर्ण केले होते.
नेटकऱ्यांनी आमीरला धरले धारेवर
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमीर खानने केलेले वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याचे बोलले जात आहे. आमीरने तिथे म्हटले होते की, “लेखक राजू हिराणी, अभिजात जोशी किंवा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हते. ओमी वैद्यने केलेला दावा सपशेल खोटा आहे.” आता नेटकऱ्यांनी ट्विटरवर आमीरची जोरदार शाळा घेतली आहे. या नव्या पुराव्यामुळे आमीर खानच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, यावर आता आमीर काय स्पष्टीकरण देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai,Maharashtra
