भिवंडी : भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ दुकानातून विकल्या गेलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे अन्न विषबाधेची (Food Poisoning) एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या 14 वरून थेट 80 वर पोहोचल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सर्व बाधित रुग्णांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात (Bhiwandi Sub District Hospital) उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Bhiwandi 80 Patients Hospitalized : 24 तासांत बाधितांचा आकडा 80 वर
मिळालेल्या माहितीनुसार, खंडूपाडा येथील या दुकानातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ खरेदी करून खाल्ले होते. त्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी, मळमळ आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला.
सुरुवातीला केवळ 14 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, लागोपाठ रुग्णांची संख्या वाढत जाऊन सकाळपर्यंत 37 आणि सायंकाळपर्यंत हा आकडा तब्बल 80 वर पोहोचला. काही नागरिकांमध्ये अद्यापही विषबाधेची लक्षणे दिसून येत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
Bhiwandi FDA Action : विनानोंदणी सुरू होते दुकान
या गंभीर घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने ‘फेमस शोरमा’ दुकानावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत,
या दुकानाचा अधिकृत परवाना (नोंदणी) मार्च 2026 मध्येच संपला होता. त्यानंतरही विनानोंदणी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू ठेवण्यात आला होता. एफडीएने दुकानातून चीज ॲनालॉग, शेझवान चटणी, टोमॅटो डिप सॉस, मेयोनीज, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेसचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी जप्त केले आहेत.
जनआरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन एफडीएने दुकानाला ‘स्टॉप बिझनेस’ (Stop Business) ची नोटीस बजावली असून दुकान पूर्णपणे बंद केले आहे.
Shawarma Food Poisoning Case Registered : मालकाविरोधात गुन्हा दाखल
या निष्काळजीपणाबद्दल ‘फेमस शोरमा’चे मालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि विषबाधेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एफडीए आणि शांतीनगर पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी पंदारे यांनी सांगितले की, “अन्न विषबाधेमुळे आतापर्यंत 80 जणांना दाखल करण्यात आले आहे. सर्वांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. आरोग्य विभाग परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.”
या घटनेची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत उपचार व्यवस्थेची पाहणी केली.
ही बातमी वाचा:
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं