Last Updated:
Gold Reserve: जोनागिरी येथे तब्बल 50 टन सोन्याचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या गोल्ड माइनिंग प्रकल्पांपैकी एक ठरू शकतो. केवळ 500 एकर क्षेत्राच्या सर्वेक्षणातून 13 टन सोने सापडण्याची शक्यता समोर आली आहे.
नवी दिल्ली: देशात सध्या मौल्यवान धातूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाच खाण क्षेत्रातून एक अत्यंत थक्क करणारी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. भारताच्या मोठा सोन्याचा साठा सापडल्याचा अंदाज भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
भारतात सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर असतानाच आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी गावात प्रचंड मोठा सोन्याचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यामुळे येत्या काही वर्षांत आंध्र प्रदेश देशातील सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य बनू शकते. अधिकाऱ्यांच्या मते या भागात तब्बल 50 टन सोने असण्याची शक्यता आहे.
राज्यात सोन्याच्या उत्खननासाठी चार महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये जोनागिरी, रामगिरी, जव्वकुला आणि चिगुरुकुंटा बिस्नातम या भागांचा समावेश आहे. मात्र या सर्व ठिकाणांपैकी जोनागिरी प्रकल्पाकडून सर्वाधिक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत, असे आंध्र प्रदेश सरकारचे खाण विभागाचे प्रधान सचिव मुकेश कुमार मीना यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी जोनागिरी येथे सोन्याच्या उत्खननासाठी 1,500 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. विशेष म्हणजे या भागात व्यावसायिक स्तरावर सोन्याचे उत्पादन सुरू झाले आहे.
आतापर्यंत केवळ 500 एकर क्षेत्रामध्येच शोधमोहीम पूर्ण करण्यात आली असून या भागातून सुमारे 13 टन सोने मिळण्याचा अंदाज आहे. अद्याप उर्वरित 1,000 एकर क्षेत्राचा पूर्ण अभ्यास आणि उत्खनन बाकी आहे. या संपूर्ण क्षेत्राचा शोध पूर्ण झाल्यानंतर केवळ जोनागिरी परिसरातूनच सुमारे 50 टन सोने मिळू शकते, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या महिन्याच्या अखेरीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू जोनागिरी गोल्ड माइनिंग प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सोन्याचे उत्खनन हे अत्यंत खर्चिक आणि तांत्रिक कौशल्याची गरज असलेले काम आहे. त्यामुळे सरकारने निविदा प्रक्रिया राबवून हे काम खासगी कंपन्यांकडे सोपवले आहे.
सोन्याच्या खाणींमधून धातू काढण्याचे काम दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. पूर्वी एका टन माती किंवा खनिज पदार्थातून सुमारे 3 ग्रॅम सोने मिळत असे. मात्र आता परिस्थिती बदलली असून एका टन म्हणजेच 1,000 किलो खनिज पदार्थाची प्रक्रिया केल्यानंतर केवळ 1 ग्रॅम सोने मिळत आहे.
तज्ज्ञांच्या मते जर एका टन खनिज पदार्थातून 0.8 ग्रॅमपेक्षा कमी सोने मिळाले तर उत्खनन आणि प्रक्रिया यावरील खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सोन्याच्या खाणींचे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
तरीही जोनागिरी प्रकल्पाबाबत सरकार आणि तज्ज्ञांमध्ये मोठा आशावाद आहे. अंदाजानुसार जर येथे 50 टन सोन्याचा साठा प्रत्यक्षात सिद्ध झाला तर आंध्र प्रदेश भारताच्या सोन्याच्या उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतो आणि देशाच्या मौल्यवान धातू उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
Mumbai,Maharashtra
Jun 20, 2026 12:35 AM IST
मुंबईपासून 1 हजार किमीवर सापडला 50 टन सोन्याचा साठा; KGF लाही मागे टाकणारा सर्वात मोठा ‘गोल्ड हब’ सज्ज
