महापुरात पिकासह जमीनही गेली, आता 9 महिनं झालं तरी मदत मिळेना, मुलांची लग्न होईनात, ABP माझा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर


Solapur Madha : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर येऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. या महापुरात शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. आता त्या जमिनी नापिकी बनल्यात. शेतात अद्यापही 10 ते 15 फुटाचे खड्डे आहेत. आता या जमीनी कशा नीट कराव्यात असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या, त्या शेतकऱ्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र ती मदत न मिळल्यामुळं शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य खचत चाललं आहे. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना मिळाली आहे, पण ती खूपच तोकडी आहे. तर काहींना 1 रुपयाचीही देखील मदत मिळाला नाही. एबीपी माझाने माढा तालुक्यातील पूरग्रस्त असलेल्या केवड गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारच्या भरोशावर बसलं तर खायचं काय? 

सरकारी मदतीची वाट बघून काही शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढून, कोणी बँकांचे कर्ज काढून जमिनी नीट करायला सुरुवात केली आहे. सरकारच्या भरोशावर बसलं तर खायचं काय? असा सवाल शेतकरी करत आहेत. जमिनी वाहून गेल्यामुळं कुटुंबांचा गाडा हाकायचा कसा? मुलाबाळांच्या शिक्षणाचा मोठा खर्च आहे, आरोग्याचा खर्च आहे. यामुळं पूरग्रस्त शेतकरी चिंतेत आहेत. पुरामुळं जमिनींची दुर्दशा झाल्यानं काही शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न देखील होत नाहीयेत. यामुळं शेतकरी तणावात आहेत.

आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जमीनी द्या, आमचं पूनर्वसन होणं गरजेचं 

काही शेतकऱ्यांना जमिनी नीट करणं शक्यच नाही. कारण 10 ते 15 फुटाचे खड्डे पडलेत. त्या शेतजमिनी नापिक झाल्या आहेत. त्यामुळं काही शेतकऱ्यांचं पूनर्वसन होणं गरजेचं आहे. तर काहींना ठोस मदत मिळणं गरजेचं आहे, जेणेकरुन त्यांना जमिनी नीट करता येतील. त्याचबरोबर पुन्हा पूर आला तर उपाययोजना म्हणून नदीच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा महापुराची परिस्थिती उद्भवू शकते. सरकारनं लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जमिनीतून काहीच उत्पन्नाची अपेक्षा नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आम्हाला ठोस मदत मिळणे गरजेचे आहे. नऊ महिने झाले तरी मदत मिळाली नाही. जिल्हाधिकारी स्वत: शेताची पाहणी करुन गेले आहेत, तरी अद्याप मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

जमीनी वाहून गेल्यामुळं मुलांची लग्न देखील होऊनात

ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून गेल्या आहेत. त्यातील काही शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होणं बाकी आहे. जमीनी वाहून गेल्यामुळं त्या मुलांची लग्न होत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार, शिवार हेल्पलाईनचं समुपदेशन

दरम्यान, पूरगस्त शेतकरी आत्महत्येचा विचार करत होते. आपली जमीन गेली पिकं गेली आता जगायचं कसं? असा विचार करत होते. या शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनशी संपर्क केला. जे शेतकरी आत्महत्येचा विचार करत होते, अशा सात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्याचं काम शिवार हेल्पलाईनने केलं आहे. शिवार हेल्पलाइनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी स्वत: या शेतकऱ्यांचे समुपदेशन केलं आहे. प्रत्यक्ष पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला. तसेच त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन देखील पाहणी केली. शेकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करण्यात शिवार हेल्पलाईनला यश आलं आहे. पण शेतकऱ्यांचे मुळ प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. ते प्रश्न जर लवकर सुटले नाहीत तर पुन्हा अडचण होऊ शकते. शेतकरी पुन्हा आत्महत्येचा विचार करु शकतात. एबीपी माझाने शिवार हेल्पलाइनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. सरकारने लवकरात लवकर या पूरग्रस्तांच्या मागण्याचा तात्काळ निर्णय घेवून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, त्यांना ठोस मदत करावी, माढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे संपूर्ण पुनर्वसन करणं गरजेचं आहे,अशी विनंती विनायक हेगाणा यांनी सरकारला केली.

पाचच्या पाच एकर जमिनी वाहून गेली, पण तोडकी मदत मिळाली

माझी पाच एकर जमीन होती. नऊ महिन्यापूर्वी सीना नदीला महापूर आला, त्यामध्ये सगळीच पाचच्या पाच एकर जमिनी वाहून गेली. या शेतात ऊस होता. ऊसासकट जमीन वाहून गेली. आता जमीन फक्त उताऱ्यावर राहिली आहे, प्रत्यक्षात शेतात काहीच नसल्याची माहिती केवड येथील पूरग्रस्त शेतकरी दत्तात्रय धर्मे यांनी दिली. या नुकसानीचे मला फक्त 80 हजार रुपये मिळाले आहेत. या पैशात काहीच होणार नाही. त्यामुळं सरकारनं आम्हाला दुसरीकडे जमीन देऊन पूनर्वसन करावे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे. 

महापुरात केळीच्या बागेसह ऊस वाहून गेला, जमिनही वाहून गेली, पण 1 रुपयाही मदत मिळाली नाही 

सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात माझी साडेतीन एकर केळीची बाग आणि दोन एकर ऊस जमिनीसकट वाहून गेला होता. निर्यातक्षम केळी तयार झाली होती. विक्रीसाठी आलेली केळी महापुरानं उद्धस्थ केली. महापुरानं आमच्या तोंडचा घास हिरावल्याची भावना केवड येथील पूरग्रस्त शेतकरी शंकर भरगवान लटके या शेतकऱ्याने व्यक्त केली. ज्यांच्या जमीनी खरवडून गेल्या त्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, माझं एवढ नुकसान होऊनही सरकारची एक रुपयाची मदत देखील मला मिळालेली नाही. आता मी व्याजाने पैसे काढून माझी जमीन नीट करत आहे. सरकारच्या भरोशावर राहिलं तर खायचं काय? असा सवाल शंकर लटके यांनी केला. 

पिकासह जमीन गेली वाहून पण मदत काही मिळाली नाही

पूर येऊन नऊ महिने झाले. या महापुरात माझा दोन एकर उस जमिनीसकट वाहून  गेला होता. एक टिपरु देखील जमिनीवर राहीलं नाही. मला सरकारची 1 रुपयाची मदत देखील मिळाली नाही. बँकेच माझ्यावर कर्ज आहे. ते कर्ज मी कसे भरायचे? असा सवाल केवड येथील पूरग्रस्त शेतकरी जालिंदर बापू धर्मे यांनी केला आहे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे. 

सरकारनं साडेतीन लाख रुपये जाहीर केले पण एक रुपयाचीही मदत मिळाली नाही

महापुरात माझी पाच एकर जमीन ऊसासह वाहून गेली, खूप मोठा फटका बसला आहे. जमिनीत 10 ते 15 फुटाचे खड्डे पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना सरकारनं साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, अद्यापही ती मदत मला मिळाली नसल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्त शेतकरी शहाजी पाटील यांनी दिली. एका बाजूला पेट्रोल डिझेलच दर वाढत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकरी मात्र संकटात आहे. या शेतकऱ्यांना सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती शहाजी पाटील यांनी केली. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *