Fitness Tips : रोज चालता का ? चालल्यानंतर पाय दुखतात ? या चुका ठरत असतील कारण, जरुर वाचा ही माहिती | लाइफस्टाईल बातम्या


व्यायामाचा विषय निघाला तर चालण्याला यादीत सर्वात शेवटी स्थान दिलं जातं किंवा त्याबद्दल फारशी चर्चाही केली जात नाही. तरीही, चालणं हा व्यायामाचा एक प्रभावी प्रकार आहे ज्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. पण चालताना होणाऱ्या काही चुकांमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो.

दररोज केवळ चालणं पुरेसं नाही, तर कसं चालता याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. संशोधनानुसार, दररोज सुमारे 8,700 पावलं चालल्यानं मृत्यूचा धोका साठ टक्क्यांपर्यंत कमी होतो. 1,10,000 जणांवर केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज 7,100 पावलं चालल्यानं हृदयविकाराचा धोका एकावन्न टक्क्यांपर्यंत कमी होतो.

केवळ चालणं पुरेसं नाही तर चालण्याचा वेग, शरीराची ठेवण म्हणजेच पोश्चर आणि पावलं टाकण्याची पद्धत यांसारखे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. चालताना लोक अनेक सामान्य चुका करतात, ज्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.

वजन कमी करण्यासाठी, हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्गांपैकी एक आहे. यासाठी तासनतास चालण्याची गरज नाही; एका अहवालानुसार, दररोज फक्त दहा मिनिटांच्या व्यायामानंही आरोग्याला महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.

अतिशय संथ गतीनं चालणं – शरीराचे कार्य कसं चालले आहे हे तपासण्यासाठी सामान्यतः पाच प्रमुख निर्देशक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हृदयाचे ठोके, शरीराचं तापमान, श्वासोच्छवासाचा वेग, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी याचं निरीक्षण केलं जातं.

Digital Commons @SHU च्या अहवालानुसार, चालण्याचा वेग हा शारीरिक कार्याचा सहावा निर्देशक मानला जातो. परिणामी, अतिशय संथ गतीनं चालणं हे ‘डिमेन्शिया’चं म्हणजे स्मृतिभ्रंशाचं लक्षण असू शकतं.

चालताना फोन हातात धरणं – चालताना फोन हातात धरल्यानं आणि मेसेजला उत्तर देण्यासाठी, ‘रील्स’ Reels पाहण्यासाठी किंवा सोशल मीडिया वापरण्यासाठी मध्येच थांबल्यानं शरीराची ठेवण बिघडू शकते. यामुळे मान आणि कमरेच्या खालच्या भागात समस्या उद्भवू शकतात. शिवाय, चालताना मनाला जो आराम मिळायला हवा, तो मिळत नाही.

चालताना हात न हलवणं – चालताना हात न हलवण्याची किंवा ते खूपच कमी हलवण्याची सवय ही चालण्यातील एक चुकीची पद्धत मानली जाते. चालताना हात नैसर्गिकरीत्या हलवल्यानं पायांच्या हालचालींशी ताळमेळ राखला जाऊन शरीराचा समतोल टिकून राहण्यासाठी आणि शरीर स्थिर राहण्यासाठी मदत होते. असं केलं नाही तर चालणं कठीण होतं आणि पडलात तर स्वतःला सावरण्याची तुमची क्षमताही कमी होते.

चुकीच्या पादत्राणांचा वापर – जड किंवा कडक पॅडिंग असलेल्या पादत्राणांमुळे, पायांचा थकवा आणि वेदना वाढू शकतात. चालण्यासाठी वापरली जाणारी पादत्राणं हलकी, हवा खेळती राहतील अशी असावीत.

पायांच्या बोटांकडे दुर्लक्ष – कदाचित याची जाणीव नसेल, पण तुमच्या पायांच्या बोटांची ताकद ही तुमच्या चालण्याच्या क्षमतेचं एक निदर्शक असते. आपण चालतो तेव्हा पायांची बोटंच आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. त्यामुळे त्याकडेही लक्ष ठेवणं आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *