झोप यावी यासाठी काही जण शांत संगीत ऐकतात. ध्यानधारणा करतात किंवा ‘व्हाईट नॉइज’ म्हणजेच एका लयीतला आवाज ऐकत झोपी जाणं पसंत करतात. ‘व्हाईट नॉइज’चे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. काहींना सुरुवातीला ही सवय खूप सुखद वाटू शकते आणि त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यासही मदत होऊ शकते. पण, भविष्यात ही सवय कानांसाठी एक मोठी समस्या ठरू शकते. संपूर्ण रात्र कानात ‘इअरबड्स’ घालून झोपणं धोकादायक ठरू शकतं, यावर कान, नाक, घसा तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
कानात दीर्घकाळ इअरबड्स घालून ठेवल्यानं कानांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, इअरबड्स अनेक तास कानात राहतात, तेव्हा तिथे उष्णता आणि ओलावा निर्माण होऊ लागतो. हे वातावरण बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतं, ज्यामुळे खाज सुटणं, जळजळ होणं, वेदना आणि गंभीर संसर्ग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
कानांच्या नैसर्गिक स्वच्छता प्रक्रियेत अडथळा – आवाजाची पातळी कमी असेल तर ‘इअरबड्स’ लावून झोपणं पूर्णपणे सुरक्षित असतं. मात्र, प्रत्यक्षात रात्रभर कानात कोणतेही बाह्य उपकरण घालून ठेवणं योग्य नाही, असं तज्ज्ञांंचं म्हणणं आहे.
इअरबड्समुळे कानांच्या नैसर्गिकरीत्या स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. शिवाय, झोपेत असताना लोक अनेकदा कुस बदलत असतात. अशा वेळी कानातील इअरबड्समुळे कानाच्या आत दाब निर्माण होतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि वेदना होऊ शकतात, तसंच कानातील त्वचेला सूजही येऊ शकते.
श्रवणशक्तीला धोका – मोठ्या आवाजात संगीत ऐकत झोपणं हानिकारक असतं. जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यानं श्रवणशक्ती हळूहळू कमकुवत होऊ शकते. आपल्या कानांनाही विश्रांतीची गरज असते. सततच्या मोठ्या आवाजामुळे कानांवर अनावश्यक ताण येतो, ज्यामुळे भविष्यात श्रवणशक्तीशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
वायरलेस इअरबड्समुळेही ऐकण्याच्या क्षमेतवर परिणाम होतो. झोपेत आपण कुस बदलतो किंवा हालचाल करतो, तेव्हा शरीराच्या दाबामुळे हे इअरबड्स बाहेर पडू शकतात किंवा कानाच्या नलिकेत म्हणजेच इअर कॅनालमध्ये खोलवर सरकू शकतात. यामुळे कानाच्या आतील भागाला दुखापत होण्याचा धोका सतत असतो.
आवाजामुळे झोप लागत नसेल, तर तज्ज्ञांनी इअरबड्सऐवजी अधिक चांगले आणि सुरक्षित पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे.
– खोली शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
– बाहेरचा आवाज रोखण्यासाठी ‘साउंडप्रूफ’ म्हणजे आवाज न येणारे पडदे वापरा.
– खोलीत ‘व्हाइट नॉइज मशीन’चा वापर करा.
– झोपताना वापरण्यासाठी खास बनवलेले मऊ ‘इअरप्लग्स’ वापरा
– झोपताना ऑडिओ ऐकण्याची सवय असेल, तर तो काही वेळानं आपोआप बंद होईल अशी व्यवस्था करावी. रात्रभर कानात ‘इअरबड्स’ घालून ठेवणं टाळा.
चांगली आणि शांत झोप घेण्याइतकीच कानांची सुरक्षितता जपणंही महत्त्वाचं आहे. रोज कानात ‘इअरबड्स’ घालून झोपत असाल, तर ही सवय आजच बदलण्याची वेळ आली आहे लक्षात ठेवा.