मुंबई : राज्यात अखेर ऑपरेशन टायगरचा मुहूर्त लागला अन् ठाकरेंच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) जाण्याचा मार्ग निवडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर जो धक्का बसला, तोच धक्का आता जून 2026 मध्येही बसला आहे. कारण, सध्या कुठल्याही निवडणुका नसतानाही त्यांच्याकडील 9 पैकी 6 खासदारांचा मोठा गट फुटल्याने उबाठा शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आहे. मात्र, ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांमध्ये चक्क धाराशिवे खासदार ओमराजे निंबाळकरांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ओमराजेंची (Omraje nimbalkar) जबाबदारी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्याकडे देण्यात आली होती.
मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने पुण्यात असलेले खासदार ओमराजे पुण्यातून मध्यरात्री दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच, तानाजी सावंत यांच्याकडेच ओमराजेंची जबाबदारी होती, असेही त्यांनी सांगितले.
तानाजी सावंत पुण्यात लीड करत होते
ओमराजेंना दिल्लीला नेण्यासाठी काल रात्री पुण्यात चार्टर विमान आलं, तेव्हा आमदार तानाजी सावंत त्याला लीड करत होते, असा गौप्यस्फोटही सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच, ओमराजे निंबाळकर समोर येऊन का सांगत नाहीत, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवं. नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे चार्टर्ट विमानात होते, तानाजी सावंत त्यांना लीड करत होते, जे स्वत: चार्टर्ड विमानात होते, अशी माहिती देखील सुषमा अंधारे यांनी दिली. दिल्लीतील हॉटेल मान्सूनमध्ये 10 तारखेला यासंदर्भात बैठक पार पडली होती, प्रत्येकाने आपल्या आपल्या महत्त्वाकांक्षा बघून निर्णय घेतला, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
तानाजी सावंतांकडे ओमराजेंची जबाबदारी
आमदार तानाजी सावंत हे शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत, मात्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे, ते नाराज झाले होते, आपल्या मतदारसंघातही त्यांचा वावर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता, ऑपरेशन टायगरमध्ये त्यांना त्यांच्या मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, तानाजी सावंत यांच्याच मतदारसंघात ओमराजेंनी लोकसभेला सर्वाधिक मतं घेत विजय मिळवला होता.
ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार
ओमराजे निंबाळकर शिंदे गटात गेले तर धाराशिवमध्ये दिसतील तिथं तोंडाला शेण फासणार असा पवित्रा धाराशिवमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला आहे. ओमराजे यांना उद्धव ठाकरेंनी भरभरून दिलं, तरीही, आईसारख्या शिवसेनेला सोडून जात असाल तर हे वेदनादायी आहे. एकदा आमदार व दोनदा खासदार केलं, तुम्ही जर शिंदे गटात गेला तर तुमच्या तोंडाला काळ फासू, असा पवित्रा धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतला आहे, तसेच धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असेही शिवसैनिक म्हणाले.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
हेही वाचा
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट