Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील


पुणे : सध्या पोलिसांच्या धाडीची जेवढी चर्चा राज्यात नाही, तेवढी चर्चा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून (FDI) होत असलेल्या धाडीची भीती पानटपरी चालक, हॉटेल व्यवसायिक आणि मेडिकल दुकानदारांनाही आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी (Tukaram Mundhe) पदभार स्वीकारताचा ही कारवाई जोमाने होऊ लागली आहे. त्यातच, पुण्यातून एक महत्वाची आणि तितक्याच तत्पर कारवाईची माहिती समोर आली आहे. पुण्यात नवीन दुचाकी खरेदी केल्याच्या आनंदात वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे सात जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून वडगाव शेरी आणि विमाननगर (Pune) परिसरात ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील एका रहिवाशाने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी जवळील मिठाई दुकानातून पेढे खरेदी केले. हे पेढे नातेवाईक आणि परिचितांना वाटण्यात आले. मात्र, पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. या प्रकरणाची माहिती पीडितांच्या नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी दिली. याबाबत त्यांनी सांगितले की, संबंधित पेढे स्थानिक मिठाई दुकानातून खरेदी करण्यात आले होते. पेढे खाल्ल्यानंतर सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची तक्रार पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आली. तक्रार मिळताच तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

तुकाराम मुंढेंशी संपर्क 

संबंधित महिलेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत त्यांनी FDA अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले. त्यानंतर FDA च्या पुणे विभागाच्या पथकाने संबंधित रुग्णालयांना भेट देत रुग्णांची माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित मिठाई दुकानावर छापा टाकून तपासासाठी पेढ्यांचे नमुने जप्त केले. हे पेढे नेमके कधी तयार करण्यात आले होते, त्यामध्ये कोणती भेसळ किंवा दूषित घटक होते का, याचा तपास आता प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे.

मिठाई दुकान सील करण्याचे निर्देश

प्राथमिक कारवाई म्हणून FDA ने संबंधित मिठाई दुकान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत माहिती देताना FDA चे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितले की, “पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.” दरम्यान, चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून पेढ्यांचे नमुने FDA कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालात त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *