IND A Vs SL A : भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video


Sri Lanka A beat India A in super over Tri Nation A Series : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेत सोमवारी रोमांचक सामना रंगला. यजमान श्रीलंका अ संघाविरुद्धच्या या सामन्यात इंडिया अ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यांश शेडगे आणि विप्राज निगमच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका अ संघानेही तितक्याच 265 धावा करत सामना बरोबरीत आणला आणि निकालासाठी सुपर ओव्हरचा आधार घ्यावा लागला. मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणी मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेली शाब्दिक चकमक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सामना टाय की सुपर ओव्हर? मैदानावरच जबरदस्त ड्रामा

सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंका अ संघाला विजयासाठी 2 धावांची गरज होती. मात्र सी. गुणसेकराने एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेसाठी धावताना तो धावबाद झाला. त्यानंतर सामना टाय झाल्याचे स्पष्ट झाले. पण गुणसेकरा धावबाद होताच पंच आणि भारतीय कर्णधार तिलक वर्मा यांच्यात जोरदार चर्चा सुरू झाली. प्रसारणकर्त्यांनी सुरुवातीला सामना टाय झाल्याचे दाखवले, तर स्क्रीनवर तिलक आणि पंचांमधील वादही दिसत होता. तिलक वर्मा सुपर ओव्हर खेळवण्याच्या बाजूने असल्याचे चित्र होते.

बराच वेळ चर्चा आणि वादविवाद झाल्यानंतर तिसऱ्या पंचांनी अखेर सामना सुपर ओव्हरद्वारे निकालात लावण्याचा निर्णय दिला. श्रीलंकाला प्रथम फलंदाजी करायची होती. भारतीय खेळाडू मैदानाबाहेर गेले होते, त्यामुळे त्यांना घाईघाईने पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी यावे लागले. दुसरीकडे श्रीलंकेचे फलंदाज मैदानात येण्यासाठी थोडा वेळ घेत असल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला.

श्रीलंकेच्या सुपर ओव्हरनंतर पुन्हा रंगला नवा वाद

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची फलंदाजी सुरू असतानाही नाट्यमय घडामोडी थांबल्या नाहीत. शेवटच्या वैध चेंडूपूर्वी सहावा चेंडू नो-बॉल आहे की नाही, यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला. तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ पाहून तो चेंडू नो-बॉल असल्याचा निर्णय दिला. या निर्णयादरम्यानही तिलक वर्मा काही मुद्द्यांवरून पंचांशी चर्चा करताना दिसले.

श्रीलंकेने आपली फलंदाजी पूर्ण केल्यानंतर भारताला विजयासाठी 17 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यावेळी तिलक वर्मा याने मैदानावरील प्रकाशाबाबतही पंचांकडे तक्रार केल्याचे दिसले. पंचांनी लाइट मीटरच्या मदतीने प्रकाशाची तपासणी केली आणि त्यानंतर भारतीय फलंदाजांना फलंदाजीसाठी मैदानात पाठवण्यात आले.

वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षाभंग

भारताच्या डावाची सुरुवात सूर्यांश शेडगेने स्ट्राइक घेत केली, तर वैभव सूर्यवंशी नॉन-स्ट्राइक एंडवर उभा होता. पहिल्या तीन चेंडूंमध्ये भारताला केवळ 3 धावा करता आल्या. कमी प्रकाशामुळे भारतीय फलंदाजांना चेंडू नीट पाहण्यात अडचणी येत असल्याचे जाणवत होते. यानंतर भारताला अखेरच्या तीन चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती आणि स्ट्राइक वैभवकडे होती. त्याने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, तर पुढील चेंडूवर चौकार मारला. मात्र त्यानंतर विजयाची शक्यता जवळपास संपुष्टात आली. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी तब्बल 8 धावांची गरज होती आणि वैभवला फक्त एक धावच करता आली. त्यामुळे भारताला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

सामना संपल्यानंतर मैदानावर पुन्हा राडा

श्रीलंका अ संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत जल्लोष सुरू करताच मैदानावर नवा वाद पेटला. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी काही कारणामुळे संतापल्याचे दिसून आले. वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या एका क्षेत्ररक्षकामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. दोन्ही खेळाडूंमधील वाद इतका वाढला की मैदानावर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. पण, स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रीलंकेचे इतर खेळाडू तातडीने मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभवचा संताप लगेच ओसरला नाही. मागे सरकत असतानाही तो प्रतिस्पर्धी खेळाडूकडे रोषाने पाहत काहीतरी बोलताना दिसला.

हे ही वाचा –

मॅच हरताना बघून बाप ढसाढसा रडला, चिमुकल्याने बदल्याचं वचन दिलं, 24 वर्षांनी पेनल्टी शूटआऊटने फायनल हरली, वचन अपुरंच राहिलं!





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *