Last Updated:
Pandharpur Accident: रविवारी दुपारी सातारा-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात घडला. यावेळी इरफान मुजावर नावाच्या युवकाने जाती-पातीच्या पलीकडे जाऊन तातडीने विहिरीत उडी घेऊन एका चार वर्षाच्या बालकाचा जीव वाचवला आहे.
Pandharpur Accident: रविवारी दुपारी सातारा-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. म्हसवड येथील सिद्धनाथचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेनं येणारे भाविक पीकअप वाहनासह विहिरीत कोसळले. पीकअप वाहनावरील नियंत्रण सुटून ही गाडी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत कोसळली. यात एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला. या भयंकर अपघातातून एक चार वर्षांचा चिमुकला सुखरुपणे वाचला आहे. याला कारण ठरलाय इरफान मुजावर.
खरं तर, रविवारी दुपारी ज्या पीकअप वाहनातून हे कुटुंब पंढरपूरच्या दिशेनं जात होतं. या गाडीच्या मागे इरफान मुजावर आणि त्याचा रणदिवे नावाचा एक मित्र दुचाकीवरून जात होते. ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा दोघांची दुचाकी या गाडीच्या मागे होती. अपघात घडताच दोघंही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी अपघातग्रस्त वाहनातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी इरफानने थेट विहिरीत उडी घेतली आणि एका चार वर्षांच्या मुलाला वाचवलं, याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी इरफानने स्वत: दिली.
या घटनेची अधिक माहिती देताना प्रत्यक्षदर्शी इरफानने सांगितलं की, “छोटा हत्तीच्या पाठीमागून मी आणि रणदिवे दुचाकीवर येत होतो. वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते विहिरीत कोसळले. वडिलांना फोनवर माहिती दिली. लोकांना घेऊन या असे सांगितले. त्यावेळी दुचाकी रस्त्याकडेला लावून विहिरीत उडी मारली. चार वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. त्याच्या छातीवर दाबून पोटातील पाणी काढले. तो वाचला. त्याच्यावेळी विलास पाटील, हणमंत रणदिवे त्यांनीही मदत करत इतर ५ जणांना बाहेर काढले. तोपर्यंत ग्रामस्थ आले. त्यांनीही मोठी मदत केली. दोन जेसीबी, एक क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन व मृतदेह बाहेर काढले.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील रहिवासी असणारे भाविक पंढरपूर सातारा महामार्गाने पंढरपूरकडे येत होते. दरम्यान, दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचं वाहन तांदुळवाडी गावाजवळ आलं. याठिकाणी एका वळणावर विहिर आहे. याच वेळी वाहनचालकाचा ताबा सुटून पीकअप वाहन थेट विहिरीत कोसळलं. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.
Pandharpur,Solapur,Maharashtra
