Pandharpur Accident: ज्यांच्या विहिरीत पडून ८ लोक गेले, ते विहीर मालक समोर, म्हणाले, ‘मी आधीच कलेक्टरला सांगितलं होतं की…’ | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Pandharpur Accident Well Owner : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील पीकअप गाडी विहिरीत पडून ८ भाविकांचा मृत्यू झाला. विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांवर खापर फोडले आहे.

पंढरपूरच्या तांदूळवाडीत अपघात, ८ जणांचा मृत्यू
पंढरपूरच्या तांदूळवाडीत अपघात, ८ जणांचा मृत्यू

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, पंढरपूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. देवदर्शन आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या अपघातात ८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर ज्या विहिरीत ही गाडी कोसळली, ते विहीर मालक रामकृष्ण कदम समोर आले आहेत. त्यांनी या संपूर्ण दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित रस्ते विकास कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विहीर मालक रामकृष्ण कदम काय म्हणाले?

“आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फार वाईट वाटतंय. अशी घटना घडायला नको होती, यात लहान मुली होती, महिला होत्या. त्यांना विहिरीबाहेर काढताना आमचा कंठ दाटून आला होता. पण याला मूळ कारण प्रशासन आहे. प्रशासनाने निष्काळजीपणा केला. आम्ही संरक्षक भिंत करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला पण प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही”, असे विहिर मालक रामकृष्ण कदम म्हणाले.

कलेक्टरकडे केली होती तक्रार, कामही पाडले होते बंद

रामकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता तयार करतानाच भविष्यातील धोक्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली होती. “रोडवेज सोल्यूशन कंपनीने जेव्हा हा रस्ता तयार करायला घेतला, तेव्हा रस्त्याची उंची खूप वाढवली गेली आणि आमच्या जमिनी आणि विहीर खाली राहिल्या. रस्ता उंचावल्यामुळे अपघात होऊन गाड्या थेट विहिरीत जाऊ शकतात, हे ओळखून आम्ही त्याचवेळी मजबूत संरक्षक भिंत अर्थात कठडा बांधण्याची मागणी केली होती. आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती आणि मागणी पूर्ण होत नाही म्हणून रस्त्याचे कामही बंद पाडले होते,” असे विहीर मालक कदम यांनी सांगितले.

प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने, कॉलमचे स्टील अजूनही उघडेच

काम बंद पाडल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘कठडा बांधून देतो’ असे आश्वासन देऊन रस्ता तयार करण्याचे काम पुन्हा सुरू केले. “आत्ताही तुम्ही अपघातस्थळी जाऊन पाहिले तर कठड्याची उंची वाढवण्यासाठी, कॉलम उभा करण्यासाठी त्यांनी लोखंडी स्टील काढून ठेवले आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अनेक दिवस झाले तरी त्यांनी ही भिंत पूर्ण केली नाही. जर प्रशासनाने आमच्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन संरक्षक भिंत बांधली असती, तर आज या ८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले नसते,” असा संताप कदम यांनी व्यक्त केला.

१५ दिवसांपूर्वीच झाला होता आणखी एक अपघात!

इथून पुढेही अशीच विहीर १०० मीटरवर आहे. १५ दिवसांपूर्वीच एक पीकअप विहिरीत गेला होता. अशा घटना वारंवार घडताहेत, आपण त्यांना तक्रार पण देतोय पण तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाहीये. सार्वजनिक बांधकामे खाते या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असून तक्रार करूनही समस्येचे निराकरण करीत नाही, असे रामकृष्ण कदम म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Pandharpur Accident: ज्यांच्या विहिरीत पडून ८ लोक गेले, ते विहीर मालक समोर, म्हणाले, ‘मी आधीच कलेक्टरला सांगितलं होतं की…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *