Pandharpur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेली ही पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत पडली. या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटेनवर राज्याचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची गोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद : मुख्यमंत्री
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तांदूळवाडी गावाजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावर प्रवास करणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या वाहनातील सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचं कळतंय. ते म्हसवड येथील सिद्धनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परत येत असताना तांदूळवाडी परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व भाविकांना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली असून संबंधितांना तातडीनं आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नेमकी घटना काय घडली? (Pandharpur Accident 8 death)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असलेले भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या गावाकडे पिकअप वाहनाने परतत असताना, म्हसवड-पंढरपूर मार्गावरील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी थेट रस्त्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत जाऊन कोसळली. या पिकअपमध्ये लहान मुलांसह एकूण 14 प्रवासी स्वार होते. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप