Last Updated:
Ayodhya Ram Mandir: अवघा १८ ते २० हजार रुपये महिना पगार असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी थेट कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि महागडे प्लॉट्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे.अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे.
अयोध्या: अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या भव्य राम मंदिरात दररोज लाखो भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने कोट्यवधी रुपयांचे दान, दागिने अर्पण करतात. मात्र, याच राम मंदिराच्या दानपेटीतून भाविकांच्या अर्पणावर डल्ला मारल्याचा एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अवघा १८ ते २० हजार रुपये महिना पगार असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी थेट कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि महागडे प्लॉट्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारानंतर आता उत्तर प्रदेश प्रशासनाने ‘ॲक्शन मोड’मध्ये येत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (SIT) स्थापन केली आहे.
हा मुद्दा सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) उचलून धरला. अखिलेश यादव यांनी राम मंदिरातील दानाच्या पैशांमधील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आणि त्यानंतर तातडीने चौकशीची चक्रे फिरली. अखिलेश यादव यांच्या आरोपानंतर मंदिरातील आर्थिक गैरव्यवहारात अनेक मोठी नावे असल्याची चर्चा सुरू झाली. प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
१८ हजारांचा पगार अन् कोटींची मालमत्ता!
राम मंदिरातील दानपात्रांमधून पैसे काढणे आणि ते मोजणे या अत्यंत जबाबदारीच्या कामासाठी काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तपास यंत्रणांना या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात आणि राहणीमानात अचानक झालेला जमीन-अस्मानाचा फरक पाहून संशय आला.
प्राथमिक चौकशीत समोर आले की, अवघा १८ ते २० हजार रुपये पगार असलेल्या एका कर्मचाऱ्याने चक्क दीड कोटी रुपयांची जमीन खरेदी केली, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने ४० लाख रुपयांचा मोठा प्लॉट घेतला. एका सामान्य कर्मचाऱ्याकडे अचानक एवढा पैसा कुठून आला? या प्रश्नाचा छडा लावताना या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
‘लवकुश’ कोण आहे?
या संपूर्ण घोटाळ्यात सध्या सर्वात जास्त चर्चा लवकुश तिवारी या कर्मचाऱ्याची आहे. लवकुश हा अयोध्येजवळील रुदौली येथील मीनापुर फगौली गावचा रहिवासी आहे. राम मंदिरात दानपेटीतील पैसे काढणे आणि मोजण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती.
तपास यंत्रणांचे (SOG) पथक जेव्हा लवकुशच्या घरी पोहोचले, तेव्हा तिथे मिळालेले दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले. त्याच्या घरातून तब्बल १० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही रक्कम घरातील कपाटात होती, तर काही रक्कम चक्क घराबाहेरील ‘शेणच्या गोवरीच्या ढिगाऱ्यात’ लपवून ठेवली होती. राम मंदिरात नोकरी लागल्यापासून लवकुशची आर्थिक परिस्थिती अचानक सुसाट बदलल्याचे गावकऱ्यांनीही सांगितले.
सध्या तपासात काय?
तपास पथकाने (SOG) लवकुश मिश्राला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. पैसे मोजताना नेमकी कशी चोरी केली जात होती आणि यात अजून कोणाकोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. ६ सदस्यांच्या या विशेष पथकाने लवकुशच्या घरावर छापा टाकला होता. यासोबतच आणखी एका संशयित कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लवकुशच्या आजीने काय सांगितले?
आरोपी लवकुश तिवारीची आजी गिरिजा देवी यांनी ‘न्यूज १८ इंडिया’ सोबत बोलताना सांगितले की, काही लोक साध्या कपड्यात त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी घरात ठेवलेली रोकड आपल्यासोबत घेऊन गेले. साध्या वेशातील लोकांसोबत राम मंदिर ट्रस्टचे चंपत रायदेखील आले होते. घरातून जाताना या साध्या वेशातील लोकांनी २०० रुपये दिले आणि काहीतरी खाऊनपिऊन घ्या, तुमची तब्येत बरी नाही असे सांगितले. आपल्या नातवावरील आरोप निराधार असून सत्य समोर येईल असे गिरिजा देवी यांनी म्हटले.
आरोपी लवकुशच्या कुटुंबाने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही खरेदी केलेली जमीन ही कुटुंबातील पैशातून खरेदी केली आहे. कुटुंबातील अनेक जण कमावत आहे, फक्त लवकुशच्या पगारावर घर चालत नसल्याचेही कुटुंबाकडून सांगण्यात आले. लवकुशचे वडील बच्चू लाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा मागील चार-पाच महिन्यांपासून मंदिरात काम करत आहेत. मंदिरातील चौरीच्या घटनेनंतर घराची झडती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
Jun 14, 2026 10:44 AM IST
Ram Mandir: १८ हजार पगारात खरेदी केली कोटींची जमीन, एसआयटीच्या रडारवर कसे आले राम मंदिराचे कर्मचारी?
