चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएल टीम नेहमी चर्चेमध्ये असते. त्याचे कारण म्हणजे ही टीम सर्वोत्तम खेळ करते अशी चाहत्यांची आणि क्रिकेट विश्लेषकांचीही भावना आहे. त्याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा या संघाचा भाग असल्याने नेहमीच या संघाबद्दल क्रिकेटप्रेमींना खास आकर्षण आहे. पण आता आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी चेन्नईने सर्वात मोठा बदल केला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची टीमचा नवा मुख्य कोच म्हणून नियुक्त केले आहे. काहीच दिवसांपूर्वी स्टीफन फ्लेमिंग यांचा टीमसोबतचा दीर्घकाळापासूनचा संबंध संपले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सीएसकेचा नवा कोच कोण होणार याची उत्सुकता होती. त्यांनी टीमसोबत 18 वर्ष घालवली होती. फ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सर्वोत्तम कामगिरी केली.
सीएसके ही आयपीएलमधील सर्वोत्तम टीम म्हणून ओळखली जाते. पण आता या टीमची सर्व जबाबदारी ही झहीर खान याच्यावर आली आहे.त्यामुळे आता झहीरच्या नेतृत्त्वात टीम कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण झहीरला सीएसके किती पगार देणार हाही क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.
झहीर खानसोबत एक वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्याला यासाठी कमीत कमी 5 ते 7 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सीएसके फ्रँचायझी ही याच रेंजमधील कोचच्या शोधात होती. पण याबद्दल अधिकृतपणे झहीर किंवा सीएसके यांच्याकडून कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही सर्व माहिती आता केवळ माध्यमांतील वृत्तानुसार समोर आली आहे. दरम्यान, झहीरला देण्यात येणारे मानधन हे सीएसकेच्या आधीच्या कोचच्या तुलनेमध्ये कमी आहे असं म्हणावं लागेल. कारण स्टीफन फ्लेमिंग यांना एका हंगामासाठी सीएसके तब्बल 7.5 कोटी मोजत होती.
दरम्यान, सीएसकेचा हेडकोच म्हणून नियुक्त होण्यापूर्वी झहीर हा एलएसजी संघासाठी मेंटॉर म्हणून काम करताना पाच कोटी रुपये कमवायचा. त्यामुळे त्याला सीएसकेकडून दिला जाणारा पगार हा 5 कोटींपेक्षा अधिकच असण्याची दाट शक्यता आहे. पण याबद्दल अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच खरी आकडेवारी कळणार आहे.