Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर


Maharashtra Rain news:  लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज मुंबईकर बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतील. मात्र, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची खरेदी करताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचे चांगलाच जोर धरला आहे. आज पहाटेपासून मुंबईत सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका गणपतीचे मंडप आणि रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सजावटीला बसण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपवत तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने शहरात पुनरागमन केले आहे. तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे नागरिक त्रस्त होते, अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते, या पावसाने उष्णतेपासून मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक सुखावले असले तरी यामुळे गणपतीच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. तर विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

Vasai Virar Rain: वसई-विरारमध्ये प्रचंड पाऊस

वसई-विरार शहरात रविवारी सकाळपासूनच पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वसई, नालासोपारा आणि विरारमधील बहुतेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यातच गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून उद्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे आजपासूनच शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाच्या मूर्ती मंडपात आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

दुसरीकडे हजारो घरगुती गणेशभक्तही आज आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र पावसाच्या जोरदार सरींमुळे मूर्ती आणताना आणि सजावटीची कामे पूर्ण करताना भक्तांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अनेकांनी मूर्ती आणि सजावटीचे साहित्य पावसापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन वापरण्याची तयारी केली आहे. गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि पावसाचा जोर अशा दुहेरी परिस्थितीत वसई-विरारकरांमध्ये आनंदासोबतच थोडीशी चिंताही पाहायला मिळत आहे.

Konkan Ganpati: कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना वाहतूक कोंडीचा फटका

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कोलाड ते इंदापूर दरम्यान सुमारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. इंदापूर, माणगाव या पट्ट्यात प्रचंड ट्रॅफिक जॅम पाहायला मिळाले. मुंबईकडून गावी जाण्यासाठी निघालेल्या कोकणवासीयांसाठी ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले फूड स्टॉल सध्या फायदेकारक ठरत आहेत. वाहतूक कोंडीत तासनतास थांबावं लागत असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्यामुळे काही तरुणांकडून असे स्टॉल उभारून  प्रवाशांना मोफत चहा, नाश्ता देण्याचे काम सुरू आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसताना दिसत आहे. इंदापूरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा  दिसत आहेत. माणगावमध्ये वाहतूक सुरळीत असली तरी संथगतीने सुरु आहेत. कालच्या तुलनेत आज वाहतूक कोंडी कमी असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा

Maharashtra Rain News: गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *