Rahul Dravid Names Ultimate International Captain : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड शांत आणि स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. आता द्रविड यांनी जगातील दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधारांमधून आपला आवडता कर्णधार निवडला आहे. विशेष म्हणजे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यात निवड करताना द्रविड यांनी इम्रान खान यांच्या बाजूने कौल दिला. मात्र, या संपूर्ण निवडीत अखेरीस महेंद्रसिंह धोनीने सर्वांना मागे टाकत नंबर-1 स्थान पटकावलं. ईएसपीएनच्या एका कार्यक्रमात राहुल द्रविड यांच्यासमोर दोन-दोन कर्णधारांची नावं ठेवण्यात आली आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यापैकी एकाची निवड करायची होती. यादरम्यान, द्रविड यांनी अनेक दिग्गज कर्णधारांना मागे टाकत आपला आवडता कर्णधार निवडला.
सुरुवात स्टीव्ह स्मिथपासून
सुरुवातीला द्रविड यांच्यासमोर बेन स्टोक्स आणि स्टीव्ह स्मिथ यांची नावं ठेवण्यात आली. द्रविड यांनी स्टीव्ह स्मिथची निवड केली. त्यानंतर स्मिथसमोर केन विल्यमसन, अर्जुन रणतुंगा, ग्रीम स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग, मायकेल क्लार्क, इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांची नावं आली. प्रत्येक वेळी द्रविड यांनी स्टीव्ह स्मिथलाच पसंती दिली. यानंतर स्टीव्ह स्मिथसमोर ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग आला. यावेळी मात्र द्रविड यांनी स्मिथऐवजी पाँटिंगची निवड केली.
पाँटिंग, बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ…
रिकी पाँटिंग आणि अॅलन बॉर्डर यांच्यातही द्रविड यांनी पाँटिंगला पसंती दिली. बॉर्डरपेक्षा पाँटिंगची निवड का केली, याबाबत द्रविड यांनी सांगितलं की, त्यांनी अॅलन बॉर्डर यांना खेळताना फारसं पाहिलेलं नाही. यानंतर पाँटिंगसमोर स्टीव्ह वॉ यांचं नाव आलं. यावेळी द्रविड यांनी स्टीव्ह वॉ यांची निवड केली.
विराट कोहली की इम्रान खान?
यानंतर राहुल द्रविड यांच्यासमोर स्टीव्ह वॉ आणि विराट कोहली यांची नावं ठेवण्यात आली. या दोघांमध्ये निवड करताना द्रविड यांनी विराट कोहलीची निवड केली. द्रविड आणि विराट कोहली यांचं नातंही क्रिकेटच्या मैदानावर बरंच जवळचं राहिलं आहे. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली विराटने भारतीय संघासाठी खेळ केला आहे. मात्र, पुढच्याच टप्प्यावर द्रविड यांनी विराटला मागे टाकत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवड केली. राहुल द्रविड यांच्यासमोर जेव्हा विराट कोहली आणि इम्रान खान हे दोन पर्याय ठेवण्यात आले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला पसंती दिली.
इम्रान खाननंतर धोनीची निवड
मात्र, द्रविड यांची निवड इम्रान खान यांच्यावर थांबली नाही. पुढील फेरीत त्यांच्यासमोर इम्रान खान आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांची नावं ठेवण्यात आली. या दोघांमध्ये निवड करताना द्रविड यांनी कोणताही संभ्रम न ठेवता धोनीची निवड केली. धोनीने भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्यामुळे द्रविड यांच्या या निवडीने धोनीला अंतिम फेरीत स्थान मिळालं. यानंतर धोनीसमोर वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांचं नाव ठेवण्यात आलं. मात्र, द्रविड यांनी पुन्हा एकदा धोनीलाच पसंती दिली.
हे ही वाचा –