Toxic Box Office Collection: यशच्या ‘Toxic’ ची बॉक्स ऑफिसवर दहशत! अवघ्या तीन दिवसांत गँगस्टर अवताराने भंजाळून सोडलं, किती कमावले?


Toxic Box Office Collection: यश (Yash) याचा ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic: A Fairytale For Grown Ups) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) दमदार कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी काहीशी घट झाली. मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

26 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांकडून चित्रपटावर टीकाही करण्यात आली. मात्र त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसच्या कमाईवर फारसा झालेला दिसत नाही. 

तीन दिवसात Toxic ने किती कमावले?

चित्रपटाने पहिल्या दिवशी 101.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा 37.65 कोटी रुपये होता. आता ‘टॉक्सिक’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, चित्रपटाने भारतात तिसऱ्या दिवशी आतापर्यंत 22.07 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

शुक्रवारी आतापर्यंत चित्रपटाचे 18,270 शो झाले असून त्याची प्रेक्षकसंख्या 23.5 टक्के राहिली. तिसऱ्या दिवसाच्या कमाईनंतर ‘टॉक्सिक’चे भारतातील एकूण नेट कलेक्शन 160.82 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता चित्रपटाची डबल सेंच्युरी अर्थात 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री कधी होते, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हिंदी व्हर्जनमधून सर्वाधिक कमाई

‘टॉक्सिक’ला हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी हिंदी व्हर्जनने सर्वाधिक 16.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर कन्नड व्हर्जनमधून 3.45 कोटी रुपये, तेलुगूमधून 1.63 कोटी रुपये आणि तमिळ व्हर्जनमधून 58 लाख रुपयांची नेट कमाई झाली आहे.

आता ‘टॉक्सिक’समोर संपूर्ण वीकेंड आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा चित्रपटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीकेंडमध्ये कमाईत मोठी झेप घेत ‘टॉक्सिक’ 200 कोटींचा टप्पा गाठणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काय आहे ‘टॉक्सिक’ची कथा?

‘टॉक्सिक’ची कथा गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यशने या चित्रपटात ‘राया’ ही भूमिका साकारली आहे. राया हा एक शक्तिशाली गँगस्टर असून हिंसा आणि विश्वासघाताच्या जोरावर तो आपलं गुन्हेगारी साम्राज्य उभं करतो.

चित्रपटात राया आणि त्याची बहीण गंगा यांच्यातील नातंही दाखवण्यात आलं आहे. नयनताराने गंगाची भूमिका साकारली आहे. या भावंडांच्या नात्याभोवतीही चित्रपटाची कथा फिरते.

गीतू मोहनदास यांनी ‘टॉक्सिक’चं दिग्दर्शन केलं आहे. यश आणि नयनतारा यांच्यासोबत कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *