Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्…! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?


Cricketer Basit Ali Suffers Heart Attack Hospitalised : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छातीत दुखत असल्याची तसेच अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने कराची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बासित अली यांना अचानक छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना काही दिवस रुग्णालयात ठेवून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान, बासित अली यांचा रुग्णालयातील फोटोही सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली असून, चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय? (What is angioplasty?)

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे त्या अरुंद किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अँजिओप्लास्टीच्या प्रक्रियेत कॅथेटरच्या मदतीने अरुंद झालेल्या रक्तवाहिनीत एक छोटा फुगा पोहोचवला जातो. हा फुगा फुगवून रक्तवाहिनीतील अडथळा बाजूला केला जातो आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा रक्तवाहिनी खुली ठेवण्यासाठी ‘स्टेंट’ नावाची छोटी जाळीही बसवली जाते.

बासित अलींची कारकीर्द

बासित अली यांनी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांचे वय अवघे 22 वर्षे होते. त्यांच्या फलंदाजीची तुलना पाकिस्तानचे महान फलंदाज जावेद मियांदाद यांच्याशी केली जात असे. विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध ते आक्रमक आणि निर्भीड फलंदाजी करण्यासाठी ओळखले जात होते. 

बासित अली यांनी पाकिस्तानसाठी 19 कसोटी सामने खेळले. 33 डावांमध्ये त्यांच्या नावावर 858 धावा आहेत. यात एका शतकासह पाच अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्येही त्यांनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 1,265 धावा केल्या. त्यांच्या नावावर एक शतक आणि नऊ अर्धशतके आहेत. मात्र, त्यांच्या कारकिर्दीवर मॅच फिक्सिंगच्या आरोपांचीही छाया पडली होती. या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर त्याचा परिणाम झाला.

हे ही वाचा –

Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *