अडचणीत सापडलेलं ‘राजा शिवाजी’चं शूटिंग, रितेशने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन; पुढे जे झालं… अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Riteish Deshmukh Raja Shivaji: एका पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रितेशने फिल्मशी संबंधित एक आठवण सांगितली. फिल्म जेव्हा एका कठीण टप्प्यावर होती, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मदत केली होती.

News18
News18

मुंबई: सध्या फक्त एकाच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, तो म्हणजे रितेश देशमुखचा राजा शिवाजी. या फिल्मने १२० कोटींहून अधिकचा गल्ला जमवत मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. अवघ्या २४ दिवसांत तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवून मराठी सिनेसृष्टीत एक नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. मात्र, इतकी मोठी कामगिरी करून दाखवणं रितेशसाठी अजिबात सोपं नव्हतं. तब्बल १० वर्षे तो या ड्रीम प्रोजेक्टवर मेहनत घेत होता. नुकतंच रितेशने हा किस्सा सर्वांसोबत शेअर केला.

एका पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रितेशने फिल्मशी संबंधित एक आठवण सांगितली. फिल्म जेव्हा एका कठीण टप्प्यावर होती, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मदत केली होती. रितेश म्हणाला, “चित्रपटासाठी आम्हाला एका भव्य सेटची गरज होती, पण संपूर्ण मुंबई-महाराष्ट्रात त्यासाठी योग्य जागाच मिळत नव्हती. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर मनासारखी जागा सापडली, पण ती सरकारी मालकीची होती. सर्वात मोठी अडचण ही होती की, त्या जागेचे भाडे हिंदी चित्रपटांच्या बजेटनुसार होते, जे आम्हाला एका प्रादेशिक चित्रपटासाठी परवडणारे नव्हते.”

देवेंद्र फडणवीस यांनी रितेशला दिला शब्द

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी रितेशने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन फिरवला. रितेशने पुढे सांगितलं, “मी फडणवीस साहेबांना फोन करून माझी अडचण सांगितली. त्यावर त्यांनी क्षणाचाही विचार न करता मला अत्यंत सकारात्मक शब्द दिला. ते म्हणाले, ‘रितेश, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत आहात, काळजी करू नका. उद्या सकाळी ती जागा तुम्हाला उपलब्ध झालेली असेल.’ त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शासकीय पातळीवरील सर्व परवानग्या एका रात्रीत मिळाल्या.” या मोलाच्या सहकार्यासाठी रितेशने भर मंचावरून देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले.

१ मे २०२६ रोजी रिलीज झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने ऐतिहासिक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. मराठीत पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणे, पहिल्या वीकेंडला सर्वाधिक गल्ला जमवणे असे सगळेच रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. या चित्रपटात रितेशने स्वतः शिवरायांची भूमिका साकारली असून त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोबतच संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि सचिन खेडेकर यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज यात पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

अडचणीत सापडलेलं ‘राजा शिवाजी’चं शूटिंग, रितेशने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन; पुढे जे झालं… अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *