Last Updated:
सकाळपासून गोदावरी नदीची पातळी वाढत चालली आहे. संध्याकाळी हायअलर्ट दिला होता. त्यानंतर…
नाशिक: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने धुमशान घातलं आहे. मागील २४ तासांपासून सततधार सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. सकाळपासून गोदावरी नदीची पातळी वाढत चालली आहे. संध्याकाळी हायअलर्ट दिला होता. त्यानंतर आता गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नदीजवळील गावांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गंगापूर धरण आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी गंगापूर धरणातून सुमारे 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24 हजार क्युसेक प्रवाह वाहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेरीस संध्याकाळी 19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचवटीत होळकर पुलाखाली मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. रामकुंड परिसरात तब्बल 19 हजार 508 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे आता गोदावरीने रौद्ररुप धारण केलं आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाआहे.
दुपारीच नाशिकमध्ये परिस्थितीत भीषण झाली होती. सकाळी पाण्याचा विसर्ग कमी होता, तोपर्यंत मंदिर आणि दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी होतं. पण दुपारनंतर विसर्ग वाढत गेला आणि संध्याकाळी दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी गेलं होतं. त्यानंतर आता गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आता मंदिर हे पाण्याखाली गेली आहे.
धरणं भरली
तर दुसरीकडे कश्यपी धरण हे आधीच 61 टक्के भरलंय. मागच्या 24 तासात 1682 MCFT पाणी गंगापूर धरणात आलं असून वाढ सुरूच आहे. गंगापूर धरण हे 97 टक्के भंले आहे. नदी नाल्यांमुळे होळकर नदीजवळ 7000 क्युसेसने पाणी येते आहे. इशारा पातळी 13045 क्युसेस आहे तर धोका पातळी 19079 क्युसेस आहे. त्यापुढे पाणी वाढल्यास सराफ बाजारात पाणी शिरण्याची भीती वर्तवली जात आहे. सगळ्या विभागांकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे, नांदूर मध्यमेश्वरजवळ तीन गावांमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
Nashik,Maharashtra
Jul 23, 2026 11:03 PM IST
