Zee Marathi: सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’चे कलाकार


ZEE MARATHI: आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाचा रंग यंदा झी मराठीच्या मालिकांमध्येही अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांमधून वारीची परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव देण्यासाठी झी मराठीने कथानकांमध्ये आषाढी विशेष भागांचा समावेश केला आहे. एकीकडे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम पंढरपूरला पोहोचली आणि ‘स्वर पंढरी’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करत भाविकांसोबत भक्तिरसाचा अनोखा अनुभव साजरा केला. तर आता ‘सनई चौघडे’ मालिकेत परब कुटुंबाने डबेवाल्यांना घरी भोजनासाठी निमंत्रित करत आषाढी वारीचा सुंदर सोहळा साजरा केला. पमाने  स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून डबेवाल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्या भजन-कीर्तनाने संपूर्ण घर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.  

वारीचा भक्तिभाव आणि सेवाभाव..

पमाची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी म्हणाल्या , “हा प्रसंग आमच्यासाठी खूप खास होता. मला आजवर प्रत्यक्ष वारी करता आली नाही, पण विठोबाविषयी माझ्या मनात खूप प्रेम आहे. शूटिंगदरम्यान डबेवाले घरी आले, त्यांनी भजनं गायली आणि वातावरण इतकं प्रसन्न झालं की जणू वारीच आमच्या घरी आली होती. सीनची तयारी सुरु असताना  आमच्या अंगणात एक लहान मुलगा  वारकरी वेशात आला आणि तो पायरीवर बसला होता मला काय मनात आले आणि मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायाशी बसले, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचे पायही चेपले. हे का करावेसे वाटले, हे मला स्वतःलाही माहीत नाही.पण  जणू पांडुरंगाच्या चरणांची सेवा केल्यासारखं वाटलं.  त्याची अशी सेवा केल्यामुळे मनाला खूप समाधान मिळाले. मला याआधी पंढरपूरच्या मंदिरात गाभाऱ्यात गायन करण्याचं भाग्य लाभलं होतं. या सीनचं चित्रीकरण करताना मला खरंच असं वाटलं की, मीही वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाले आहे. वारकऱ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवणं, त्यांची सेवा करणं आणि त्या भक्तिमय वातावरणाचा भाग होणं, हा अनुभव माझ्यासाठी खूप समाधान देणारा होता. या प्रसंगामुळे मला वारीचा भक्तिभाव आणि सेवाभाव अगदी जवळून अनुभवता आला. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन डबेवाल्यांसाठी प्रेमाने आणि भक्तिभावाने जेवण तयार करतं. ही केवळ अन्नसेवा नसून विठ्ठलभक्तीची आणि माणुसकीची सेवा आहे, असा संदेश या प्रसंगातून दिला जातो”

याच विशेष भागात जयची भूमिकाही महत्वाचे वळण घेणार आहे. जय पहिल्यांदाच स्वतः खिचडी बनवताना दिसणार आहे. शरूच्या त्याच्या आयुष्यातील आगमनामुळे जयच्या स्वभावात होत असलेला सकारात्मक बदल या प्रसंगातून दिसून येईल. राज हंचनाळे म्हणाले , ” मी घरी नेहमी स्वयंपाक करतो, त्यामुळे स्वयंपाकाची मला आवड आहे. पण या प्रसंगासाठी जय शेकडो वारकऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न बनवणं किती मेहनतीचं आणि जबाबदारीचं काम असतं, याची मला त्या वेळी खरी जाणीव झाली. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि शिकण्यासारखा होता.

‘कमळी’ मालिकेतही कथानकाला नवं वळण

दुसरीकडे ‘कमळी’ मालिकेतही आषाढी वारी विशेष भागातून कथानकाला नवं वळण मिळणार आहे. सरोज महाजनांच्या घरी येणार असून, तिच्या आगमनानंतर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. राजन आणि अन्नपूर्णा यांच्यासमोर कमळी हीच महाजन कुटुंबाची खरी नात असल्याचं सत्य उलगडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहणार आहे.

या विशेष भागाच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना  कमळीची भूमिका साकारत असलेली  विजया बाबर  म्हणाली , “आषाढी एकादशीच्या निमित्ताने सेटवर खूप भक्तिमय वातावरण होते. आरती, अभंग आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे संपूर्ण सेटमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. कॅमेरा बंद असतानाही आम्ही कलाकार आणि  टेक्निशियन टीम अभंग म्हणत होतो, गाणी गात होतो आणि टाळांच्या तालावर नाचत होतो. आरतीच्या वेळी सेटवरील प्रत्येकजण मनापासून सहभागी झाला होता. त्या क्षणी खरोखरच पंढरपूरातील भक्तीचा अनुभव सेटवर आल्यासारखे वाटत होते. हे चित्रीकरण आमच्यासाठी खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरले.या भागात कमळीला सरोजबद्दल एक महत्त्वाचा धागा मिळणार आहे. सरोज एका कारच्या मागे धावत असल्याचे कमळी  पाहते. सुरुवातीला तिला त्यामागचे कारण समजत नाही, पण यामुळे पुढील कथानकात एक नवीन वळण येणार असल्याची झलक प्रेक्षकांना मिळेल.आषाढी वारीचे हे खास भक्तिमय भाग पाहायला विसरू नका! ‘सनई चौघडे’ दररोज रात्री ८.३० वा. आणि ‘कमळी’ दररोज रात्री ९ वा, सदैव तुमच्या झी मराठीवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *