Ankita Walawalkar on CJP: नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांची डोकी फोडली. अनेकांनी फरफटत नेल्याचं दिसलं. विद्यार्थी तरूणींवरही बेछूट लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींनी कलाकारांनी पाठिंबा दिला. अनेकांनी तर दिल्लीत जाऊन आंदोलनाला सपोर्ट केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तर अनेकांनी आंदोलनाला न जाणं पसंत केलं. अनेकांनी या प्रकरणावर मौन बाळगलं. तर काहींनी सरकारची बाजू घेत कॉकरोच जनता पार्टीला विरोध केला. अनेकांचे राजकीय अजेंडे समोर येत असताना कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अभिनेत्री अंकिता वालावलकरने केलेल्या पोस्टची सगळीकडेच चर्चा आहे.
काय म्हणाली अंकिता वालावलकर?
दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोचे जनता पार्टीच्या आंदोलनाला ‘बिग बॉस मराठी ‘ फेम अंकिता वालावलकरने विरोध केलाय. ती म्हणाली ‘ जर खरंच कोणत्याही गोष्टी मागे राजकीय अजेंडा नसेल, नसरापूरच्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर का उतरलं गेलं नाही? आजही त्या नराधमाला फाशी झालेली नाही. काही प्रकरणांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरतात आणि काहींमध्ये शांतता का असते? ती महाराष्ट्राची लेक होती ना? नसरापूरच्या चिमुकलीसाठीही तितक्याच ताकदीने आवाज उठायला हवा होता. प्रत्येक जण आपापली पोळी भाजून घेतो.त्यामुळे भडकाऊ पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करू नका.शांत रहा, भांडण टाळा.’ असं ती म्हणाली आहे. इंस्टावर कॉकरोच जनता पार्टीचा एक व्हिडिओ शेअर करत तिने नीट पेपरफुटीवरून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोध केलाय. ती म्हणाली ‘ तुम्हाला वाटत असेल तर अनफोलो करा, पण माझा या ‘जय हिंद’ला पाठिंबा नाही.’


दरम्यान,अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा, आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.