Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  


हरारे :  भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी 20 मालिका उद्यापासून सुरु होत आहे. इंग्लंड आणि आयर्लंड विरोधातील मालिकेत भारताचा पराभव झाला होता. कर्णधार श्रेयस अय्यरनं पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की संघातील खेळाडूंनी निर्भयपणे क्रिकेट खेळलं पाहिजे, टीकाकारांच्या दबावात येऊ नये. इंग्लंडमधील काळ आमच्यासाठी आव्हानात्मक होता, मात्र काही सकारात्मक गोष्टी समोर आल्याचं श्रेयस अय्यरनं म्हटलं. मैदानात उतरल्यानंतर जागरुकता आणि परिस्थितीनुसार कामगिरी करणं आवश्यक असल्याचं श्रेयस अय्यर म्हणाला. 

श्रेयस अय्यरचा पहिला झिम्बाब्वे दौरा

श्रेयस अय्यर पहिल्यांदा झिमाब्वेच्या दौऱ्यावर आला आहे. कमी काळात परिस्थितीसोबत जळवून घेणं हे मोठं आव्हान असेल, असं तो म्हणाला. आमच्या पैकी काही खेळाडू इथं पहिल्यांदा खेळत आहेत, जितक्या लवकर ते परिस्थितीला समजून घेतील तितके चांगले परिणाम मिळतील, असं अय्यर म्हणाला.

श्रेयस अय्यर म्हणाला की युवा खेळाडूंनी अलीकडच्या काळात झालेल्या टीकेनंतर अपयशाच्या भीतीशिवाय खेळलं पाहिजे. अपयशाला घाबरु नये, जेव्हा तुमच्या मनात तसे विचार असतात तेव्हा तुम्ही बचावासाठी खेलता. मात्र, जेव्हा भीती नसते तेव्हा तुम्ही सर्वश्रेष्ठ कामगिरी करता, असं श्रेयस अय्यर म्हणाला. बाहेरचे लोक काय म्हणतात याचा विचार करु नये, वर्तमानावर लक्ष केंद्रित करावं, जितकं चांगलं क्रिकेट आम्ही  खेळू, एक संघ म्हणून जितकी चांगली कामगिरी करु तितकं टीमसाठी चांगलं असेल, असं श्रेयस अय्यरनं म्हटलं. 

इंग्लंडहून थेट झिम्बाब्वेत पोहोचणं आणि एका सराव सत्रानंतर मॅच खेळणं आव्हानात्मक आहे. श्रेयस अय्यर म्हणाला हे निश्चितच आव्हानात्मक आहे. आम्ही काल इथं पोहोचलो आणि आज सराव करतोय आणि उद्या सामना आहे. मात्र हे मजेशीर आहे, जर तुम्ही अशा स्थितीत चांगली कामगिरी करु शकला तर तुम्हाला स्वत: चा अभिमान वाटू लागतो. 

इंग्लंड, आयर्लंडमध्ये अपयश, श्रेयस म्हणाला…  

श्रेयस अय्यर म्हणाला की आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यानं टीमला खूप अनुभव दिला आहे. निकाल आमच्या बाजूनं लागला नाही. मात्र, टीम म्हणू सर्वजण एकत्र आणि जवळ आलोय.टीम म्हणून कसं खेळलं पाहिजे यावर या काळात आम्ही खूप चर्चा केली. आपल्याला असा अनुभव वारंवार मिळत नाही, हा आव्हानात्मक काळ होता, जितक्या लवकर तुम्ही यातून बाहेर पडता तितकी टीम चांगली होते, असं श्रेयस अय्यर म्हणाला.  
 
वैभव सूर्यवंशीचं पदार्पण अपेक्षेप्रमाणं राहिलं नाही. अय्यर म्हणाला की इंग्लंड आणि आयर्लंडच्या अनुभवातून सूर्यवंशी आणि टीमचे इतर खेळाडू समजूतदार होतील. सर्व युवा खेळाडूंनी निश्चित रुपानं अभ्यास केला असाले. टी 20 मालिकेनंतर त्यांना चांगला वेळ मिळाला आहे. जिथं वैभवकडून चूक झाली असेल ती त्यानं नक्की सुधारली असेल, त्यासाठी वैयक्तिक रुपानं मला त्याला सल्ला देण्याची गरज नाही, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *